VIDEO : विनायक मेटे मराठा समाजाच्या हितासाठी ते काम करत नाहीत : सुरेश पाटील

अमोल सावंत
Monday, 10 August 2020

कोल्हापूर प्रेस क्‍लबमध्ये मराठा आरक्षण संघर्ष समितीतर्फे पत्रकार परिषद झाली. 

कोल्हापूर - "आमदार विनायक मेटे यांची आमदारकीची मुदत संपत आली आहे. त्यांनी आता अशा पद्धतीचे राजकारण केले तरच त्यांची आमदारकी जिवंत राहणार आहे; पण मराठा समाजाच्या हितासाठी ते काम करत नाहीत, असं माझं स्वत:चं मत आहे. त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी, प्रलंबित मागण्यांसाठी जर आंदोलन कराचये असेल तर त्यांनी पुणे येथे 19 तारखेला होणाऱ्या गोलमेज परिषदेत यावे आणि आपली स्वच्छ भुमिका मांडावी, असं माझं प्रामाणिक मत आहे, असे मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेश पाटील यांनी सांगितले. मराठा समाजातील लोकंसुद्धा आमदार विनायक मेटे यांना नावं ठेवत आहेत. ते राजकारण करत आहेत का, या प्रश्‍नावर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. कोल्हापूर प्रेस क्‍लबमध्ये मराठा आरक्षण संघर्ष समितीतर्फे पत्रकार परिषद झाली. 

वाचा - स्थायी समितीचे सभापती संदीप कवाळे यांनी दिला राजीनामा 

पाटील म्हणाले, "विनायक मेटे यांची मागणी अशोक चव्हाण यांना काढा आणि एकनाथ शिंदे यांना त्या ठिकाणी नेमा, अशी जी त्यांची मागणी आहे. ती मागणी आमच्या मराठा समाजाच्या हितासाठी योग्य नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. हे आरक्षण सुप्रिम कोर्टात आहे. राज्य सरकार सुप्रिम कोर्टात काय बाजू मांडतेय, आमच्या सारख्या अनेक संघटनांचे वकिल त्या बाजू काय मांडतात, हा एक वेगळा विषय आहे. आमच्या प्रलंबित मागण्यांसाठी आम्ही पुणे येथील रंगदर्शन हॉल, टिळक रोड, हिराबाग गणपती चौक, अप्सरा हॉटेलच्या मागे 19 तारखेला गोलमेज परिषद घेत आहोत. त्यामध्ये मराठा आरक्षण संघर्ष समिती आहे. मराठा समन्वयक समिती आहे. राज्यातील 50 ते 55 संघटना एकत्रित करुन आम्ही 19 तारखेला पुणे येथे राज्यव्यापी गोलमेज परिषद आयोजित केली आहे. गोलमेज परिषदेत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न येईल. मराठा समाजाचे प्रलंबित 11 ते 12 प्रश्‍न यावर चर्चा होईल. आंदोलनाची दिशा ही 19 तारखेला गोलमेज परिषदेत ठरविण्यात येणार आहे.'' 

मंत्री अशोक चव्हाण आणि मेटे यांचं कुठे बिनसले आहे, यावर ते म्हणाले, "त्यांचे राजकारण काय आहे, हे मला माहिती नाही. मराठा समाजाचे काम करत असताना कुठल्याही पक्षाच्या एका मंत्र्यावर काहीतरी आरोप करणे. त्यांना काढा, त्यांना घ्या, असे म्हणण्याचे अधिकारी मराठा समाजाला नाहीत. जो प्रामाणिकपणे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी भुमिका घेऊन रस्त्यावर येऊन उतरतो. त्यांनी मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या आणि मराठा समाजाचे आरक्षण कसे मिळवून देता येईल, यासाठी लढले पाहिजे. यासाठीच आम्ही गोलमेज परिषद आयोजित केली आहे.'' 

स्वत:च्या स्वार्थासाठी मेटे हे सर्व काही करत आहेत का, या प्रश्‍नावर ते म्हणाले, "आमदार मेटे हे अनेक वर्षे मराठा समाजासाठी काम करत आहेत. तरी आताची त्यांनी अशोक चव्हाणांना काढा ही त्यांची भुमिका आम्हाला काही पटलेली नाही. मेटे हे स्वार्थासाठी काम करत आहेत, हे तुम्हां सर्वांना माहिती आहे. एखाद्या मंत्र्याला काढा, दुसऱ्या मंत्र्याला घ्या, म्हणण्याचा उद्देश काय? ते असे का म्हणत आहेत? तुम्ही याच मंत्र्यांकडून काम करुन घ्या. ते कुठे चुकत असतील तर चला मिळून जाऊ. सरकारच्या मंत्र्यांना विचारु. सरकारच्या मुख्यमंत्र्यांकडे जाऊ. सरकारला जे काही पाहिजे आहे, ते मदत करु. जेणेकरुन हा प्रश्‍न सुटावा. हायकोर्टाने या राज्य सरकारने दिलेले 12 ते 13 टक्के आरक्षण ते शेवटपर्यंत सुप्रिम कोर्टापासून ते मिळालं पाहिजे. याचा फायदा मराठा समाजाच्या मुला-मुलींना झाला पाहिजे. आम्ही गोलमेज परिषदेसाठी आम्ही सर्वांना निमंत्रित करत आहोत. आम्हाला गोलमेज परिषदेत 50 लोकपेक्षा जास्त लोकांना येण्यासाठी परवानगी नाही; पण प्रत्येक जिल्ह्यातून एक किंवा दोन व्यक्ती, एक प्रतिनिधी तिथे उपस्थित राहील. राजकीय लोकांना मात्र निमंत्रित केलं जाणार नाही.'' 

पत्रकार परिषदेला समितीचे विजयसिंह महाडिक, मराठा विकास संघटनेचे भरत पाटील, अखिल भारतीय मराठा संघाचे भास्कर जाधव, दिग्विजय मोहिते, राजमाता जिजाऊ ब्रिगेडचे चंद्रकांत पाटील, जयदीप शेळके, उदय लाड, शिवाजीराव लोंढे, रमेश पाटील, दादासो देसाई आदी उपस्थित होते.

संपादन - मतीन शेख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suresh patil criticized on vinayak mete