आता स्वाभिमानीही लढवणार मनपा निवडणूक

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 November 2020

हा पक्ष फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्‍नापुरताच लढत नाही तर सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी देखील लढत आहे

कोल्हापूर - आगामी कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाने सर्वच्या सर्व जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

वैभव कांबळे म्हणाले, कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील जनतेला स्वाभिमानी पक्षाच्या कामाच्या आणि आंदोलनाच्या पध्दतीची माहिती आहे. हा पक्ष फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्‍नापुरताच लढत नाही तर सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी देखील लढत आहे. कोल्हापूर शहरातील नागरिकांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. सध्या महापालिकेच्या राजकारणातील सत्ताधारी आणि विरोधक हे फक्त राजकारण करण्यातच मग्न आहेत. त्यांना नागरिकांच्या प्रश्‍नाशी कांहीही घेणे,देणे नाही. त्यामुळे स्वाभिमानी पक्षाने निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी जनार्दन पाटील, अजित पोवार, संजय चौगुले, आण्णा मगदूम आदी उपस्थित होते.  

हे पण वाचा शंभर दिवसांत आठ लाख 82 हजार घरे बांधणार ; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

 

यावेळी स्वाभिमानीचा निवणूक अजेंडा पण सांगण्यात आला. कोल्हापूर शहरातील नागरिकांना स्वच्छ आणि ताजा भाजीपाला मिळण्यासाठी खेड्यातील माल थेट शहरातील नागरिकांना पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार. शहरात रस्ते, पाणी, स्वच्छतेचा प्रश्न तसेच अनेक पायाभूत सुविधा अद्याप उपलब्ध नाहीत. ते सर्व प्रश्न प्रामुख्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी आणि आरोग्याच्या सोयी मिळतील याकडे लक्ष देण्यात येणार. मागील अनेक वर्षांपासून स्थानिक नेत्यांचे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्याकडे लक्ष नाही. नागरिकांना देखील सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: swabhimani shetkari sanghatana entry in kolhapur municipal corporation election