महापालिकेच्या राजकारणात मोठ्या पाच राजकीय पक्षांसोबतच इतर पक्षही ठोकणार शड्डू

डॅनियल काळे
Saturday, 28 November 2020

आम आदमी पार्टी, आरपीआयसह, स्वाभिमानीही रिंगणात

कोल्हापूर : महापालिकेच्या राजकारणात मोठ्या पाच राजकीय पक्षांसोबतच आम आदमी पार्टी, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर पक्षही ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. आपापल्या ताकदीप्रमाणे ही निवडणूक लढवून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न या राजकीय पक्षांचा आहे.

महापालिकेतील अपक्षांचे राजकारण संपल्यानंतर आता पक्षीय पातळीवर महापालिकेतील राजकारण केले जात आहे. दोन्ही काँग्रेस, शिवसेना, भाजप, ताराराणी आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राजकीय पक्षाच्या वतीनेही आता प्रयत्न केले जाणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे.

आम आदमी पार्टी 
महापालिकेच्या राजकारणात यंदाच्या वर्षी आम आदमी पार्टीनेही उतरण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष संदीप देसाई यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेतील विविध प्रश्‍नांसंदर्भात मोर्चादेखील काढण्यात आले. घरफाळा घोटाळ्याचा विषयही त्यांनी लावून धरला आहे. महापालिकेच्या ८१ प्रभागात उमेदवार उभे करण्याचा पक्षाचा निर्धार आहे. यापैकी काही जागा लक्ष्य केल्या जाणार असून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)
भारतीय जनता पक्षाबरोबर आरपीआय आठवले गटाची युती असली तरीदेखील प्रत्येक निवडणुकीत या पक्षाची भाजपच्या पाठीमागून अक्षरशः फटफटच होत आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळत नसल्याने या पक्षाने 
   
महापालिकेची निवडणूक स्वबळावर  लढविण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील मागासवर्गीय प्रभाग आणि झोपडपट्टीविभागाचा समावेश असलेल्या प्रभागातून उमेदवार निवडून त्यांच्या पाठीमागे ताकद लावण्याचा प्रयत्न राहणार आहे. कांही जागावर विशेष लक्ष्य केंद्रित करुन पक्षाचे कार्यकर्ते निवडून आणण्यासाठी ताकद लावली जाईल, असे प्रा.शहाजी कांबळे यांनी सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटना
स्वाभिमानी शेतकरी संघटना ही केवळ शेतकऱ्यांचेच प्रश्‍न सोडविणारी नाही तर शहरी भागातही पक्षाला आपले जाळे पसरायचे असल्याने या पक्षानेही महापालिकेची निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे.पक्षातर्फे कांही भागात उमेदवार उभे करुन ते निवडून येण्यासाठी प्रयत्न केले जातील.मध्यतंत्री पत्रकार परिषद घेऊन तशी घोषणा केली आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swabhimani Shetkari Sanghatana press conference kolhapur