कोल्हापुरातील या तालमीने शेतकऱ्यांची सावकारी पाशातून केली होती मुक्तता

संभाजी गंडमाळे
Friday, 31 July 2020

रंकाळवेस तालीम म्हणजे  कोल्हापुरातील णेश विसर्जन मिरवणुकीतील आकर्षण हे एक गेल्या काही वर्षातील समीकरण असले तरी या तालमीला मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी याच तालमीच्या कार्यकर्त्यांनी क्रेडिट सोसायटीची स्थापना केली.

रंकाळवेस तालीम म्हणजे  कोल्हापुरातील णेश विसर्जन मिरवणुकीतील आकर्षण हे एक गेल्या काही वर्षातील समीकरण असले तरी या तालमीला मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी याच तालमीच्या कार्यकर्त्यांनी क्रेडिट सोसायटीची स्थापना केली. तालमीच्या वतीने भव्य मंडप घालून पटसोंगट्या स्पर्धा रंगायच्या. जिंकणाऱ्या टीममधील चौघांना प्रत्येकी एक तोळ्याची सोन्याची चेन आणि हरणाऱ्या टीममधील चौघांना प्रत्येकी अर्धा तोळ्याची अंगठी, अशी बक्षिसे असायची. 

रंकाळवेस तालमीची स्थापना 1901 ची. करवीर संस्थानकडून तालमीच्या इमारतीसाठी जागा मिळाली आणि तालमीची इमारत उभी राहिली. तालमीच्या आखाड्यात पिळदार शरीरयष्टीसाठी परिसरातील तरुणाई घाम गाळायची. सध्या आखाडा नसला तरी अत्याधुनिक व्यायामशाळा आहे. शिवराम आयरेकर, ऍड. कृष्णात माने, धोंडिराम यादव, बळवंत आयरेकर (काका), भिमराव पाटील, अब्दुल पठाण, आनंदराव साळोखे, पांडबा यादव, मनोहर आयरेकर, जयसिंग माने, रंगराव साळोखे, बाबासाहेब टाकळीकर, मारुती लाड आदी तत्कालीन कार्यकर्त्यांनी तालमीचे कार्य अधिक व्यापक केले. वस्ताद राजाराम डवंग यांच्या मार्गदर्शनाखाली व्यायामाबरोबरच शिवकालीन युद्धकलेचे धडे परिसरातील तरुणाईला मिळायचे. तत्कालीन नगराध्यक्ष एन. डी. जाधव यांनी तालमीला मोठी मदत केली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तालमीची इमारत उभारली गेली. 1972 साली त्यांनी रंकाळवेस तालमीसह शहरातील अकरा तालमींना गणेशोत्सवात मोठ्या मूर्ती दिल्या आणि गणेशोत्सवाला भव्यता आली. शहरात पहिल्यांदा गणेशोत्सवात विद्युतरोषणाई ही संकल्पना आणली ती याच तालमीने. "कांचनमाला'ची रनिंग लाईटची टॅडो कमान त्यावेळी प्रसिद्ध केली. ही रोषणाई पहाण्यासाठी लोक मोठी गर्दी करत. त्याशिवाय गणेश विसर्जन मिरवणुकीत शालिनी सिनेटोनमध्ये शूटिंगसाठी वापरला जाणारा मोठा जनरेटर याच तालमीने पहिल्यांदा आणला. 
तालमीतर्फे भव्य मंडप घालून पटसोंगट्या स्पर्धा रंगायची. त्यात जिल्ह्यातून पंचवीसहून अधिक संघ सहभागी व्हायचे. शंकरराव जाधव (चांदी वस्ताद) यांच्या मार्गदर्शनाखाली तालमीत भजनाची परंपरा सुरू झाली. तालमीने दिलेला उमेदवार महापालिका निवडणुकीत निवडून आणण्याची परंपराही या तालमीने जपली. 
स्वातंत्र्यपूर्व काळात सावकारी पाशातून शेतकऱ्याला मुक्त करण्यासाठी याच तालमीच्या कार्यकर्त्यांनी 1925 साली श्री राम क्रेडिट सोसायटीची स्थापना केली. आजही ही संस्था सुरू असून शंकरराव शिंदे-जाधव यांच्यासह तत्कालीन कार्यकर्त्यांनी या संस्थेच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता. संस्थेचे साडेसातशेहून अधिक सभासद आहेत. तालमीची इमारत बांधल्यानंतर वरचा मजला दवाखान्यासाठी भाड्याने दिला गेला. त्यामागे परिसरातील गरजू, गरिब लोकांवर अत्यंत माफक शुल्कात उपचार व्हावेत, हाच उद्देश होता. सध्या हीच परंपरा डॉ. किशोर निंबाळकर पुढे नेत आहेत. तालमीने अनेक आरोग्य शिबिरे घेतली आणि विविध सेवाभावी उपक्रमातही सक्रिय पुढाकार घेतला आहे. त्याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत मदतीचा हातही सतत पुढे केला आहे. 1984 साली तालमीने साई मंदिर बांधले. सध्या येथे प्रत्येक गुरुवारी भाविकांची मोठी गर्दी असते. 1985 पासून माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर कालेकर तालमीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. राजेंद्र शिंदे उपाध्यक्ष आहेत तर रघुनाथ जाधव सचिव म्हणून काम पहात आहेत. 

ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सध्या तरुण पिढी तालमीची परंपरा नेटाने पुढे नेत आहे. यंदाही साईबाबांच्या मूर्ती शेजारीच गणपती आणि तालमीच्या चॉंदसाहेब पंजांची प्रतिष्ठा 

संपादन ः यशवंत केसरकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This talim in Kolhapur had liberated the farmers from the debt trap