धक्कादायक ; कोरोनाच्या भीतीने शिक्षकाने सासुरवाडीतच घेतला गळफास अन्...  

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

पत्नी व बाळाला पाहण्यासाठी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात गडहिंग्लजमधील शेंद्री रोडवरील सासूरवाडीला आले होते. 

गडहिंग्लज (कोल्हापूर) : कोरोना तपासणी अहवाल निगेटीव्ह आले असतानाही, यामुळे आलेल्या नैराश्‍यातून खानापूर (ता. हुक्केरी, जि. बेळगाव) येथील एका शिक्षकाने गडहिंग्लजमधील सासूरवाडीच्या घरात इलेक्‍ट्रीक सर्व्हीस केबलने गळफास घेवून आत्महत्या केली. रविवारी (ता. 28) रात्री नऊच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीला आली. चंद्रशेखर दुंडाप्पा तळवार (वय 35) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. 

रविवारी रात्री नऊच्या सुमारास जेवणासाठी आजूबाजूला हाक देवून चंद्रशेखर यांच्या शोधात पत्नी अश्‍विनी इमारतीच्या स्लॅबवर गेली. तेथील एका कोपऱ्यात चंद्रशेखर बसलेले दिसले. जेवणासाठी खाली येण्यास सांगितले असताना चंद्रशेखरकडून काहीच उत्तर येत नव्हते. यामुळे घाबरून अश्‍विनी घरी येवून हा प्रकार सांगितला. त्यानंतर चंद्रशेखर यांचा मेहुणा, सासू, सासरे व मेहुणी स्लॅबवर गेले. जवळ जावून पाहिले असता चंद्रशेखर स्लॅबच्या कॉलमच्या सळीला इलेक्‍ट्रीक केबलने गळफास लावून घेतलेले व नाकातून रक्तस्त्राव झाल्याचे दिसले. चंद्रशेखर यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांचा मेहुणा आकाश विटेकरी यांनी पोलिसात फिर्याद दिली. अधिक तपास पोलिस हवालदार प्रशांत गोजारे करीत आहेत.

दरम्यान, चंद्रशेखर हे बेळगाव येथे शिक्षक आहेत. नोकरीमुळे ते सध्या हिंडलगा (बेळगाव) येथे राहण्यास होते. त्यांची पत्नी अश्‍विनी प्रसुतीसाठी आठ महिन्यापूर्वी माहेरी गडहिंग्लजला आली आहे. कोरोनाचा लॉकडाऊन असल्याने ती माहेरीच राहिली आहे. मार्च महिन्यात घशाचा त्रास होवू लागल्याने चंद्रशेखर यांनी बेळगाव येथेच कोरोनाची तपासणी करून घेतली. त्याचा अहवाल निगेटीव्ह आला होता. त्यानंतर चौदा दिवस होम क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर ते गावी खानापूर येथे गेले. तेथून ते पत्नी व बाळाला पाहण्यासाठी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात गडहिंग्लजमधील शेंद्री रोडवरील सासूरवाडीला आले होते. 

हे पण वाचा -  फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाची ‘हसीन’स्वप्ने; वाचा, कोणी केली टीका?

 एकलकोंडेपणातून वावर
कोरोनाची तपासणी करून घेतल्यापासून श्री. तळवार खानापूरच्या घरात एकलकोंडेच राहत होते. कोणाशी काहीच बोलत नव्हते. तेथून गडहिंग्लजमधील सासूरवाडीत आल्यानंतरही ते एकटे-एकटे राहत होते. ते कोणाशीही मोकळ्या मनाने बोलत नव्हते. नेहमी घराच्या स्लॅबवर जावून एकटेच बसायचे, असेही फिर्यादीत नमूद केले आहे.

हे पण वाचा -  माहिती लपविणे कोरोनाबाधितांना पडणार चांगले महागात

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: teacher suicide in kolhapur gadhinglaj