देऊळ बंद, रेल्वे बंद, खेळणी कोठे विकायची? : कोरोनामुळे झाली अंध कुटुबीयांची परवड

लुमाकांत नलवडे
Thursday, 13 August 2020

कोरोनामुळे जगरहाटी बंद झाली. यातून अंध कुटुंबेसुद्धा सुटली नाहीत. लॉकडाउन सुरू झाल्यावर होते ते पैसे खर्च करून पहिला महिना आर्थिक भार त्यांनी सोसला. दुसऱ्या महिन्यात सरकारी, खासगी नोकरी करणाऱ्यांनी त्यांना थोडीफार आर्थिक, धान्य स्वरूपात मदत केली. 

कोल्हापूर,  ः पांढरी काठी टेकत, संसाराचे ओझे घेऊन ते कधी अंबाबाई मंदिर, कधी रेल्वे स्थानक, तर कधी रेल्वेतून गांधीनगर, रुकडी, जयसिंगपूर, मिरजपर्यंत ते जात होते. दिवसभरात चार पैसे मिळवून संसाराचा गाडा ढकलत होते. अंध असूनही कुटुंबीयांना प्रकाश देण्याचे काम ते करत होते, मात्र देऊळ बंद झाले, रेल्वेची चाके थांबली, आता खेळणी कोठे विकायची, पेपर कोठे विकायचा, उदरनिर्वाहासाठी पैसे मिळवायचे, असा प्रश्‍न 40 अंध कुटुंबीयांना पडला आहे. आर्थिक हातभारातून आपल्या अंधारलेल्या जीवनात मदतीचा प्रकाश कधीतरी येईल, याकडे त्यांचे डोळे लागले आहेत. 

कोरोनामुळे जगरहाटी बंद झाली. यातून अंध कुटुंबेसुद्धा सुटली नाहीत. लॉकडाउन सुरू झाल्यावर होते ते पैसे खर्च करून पहिला महिना आर्थिक भार त्यांनी सोसला. दुसऱ्या महिन्यात सरकारी, खासगी नोकरी करणाऱ्यांनी त्यांना थोडीफार आर्थिक, धान्य स्वरूपात मदत केली. 
हा लॉकडाउन त्यांच्या आयुष्याचा एक एक दिवस अंधारमय करत आहे. हे अंध बंधू पहाटेपासून अंबाबाई मंदिर परिसरात फुले, माळा, गजरे, खेळणी विकत होते. त्यातून दिवसाकाठी चार-पाचशे रुपये येत होते, मात्र देऊळ बंद झाले आणि त्यांच्या संसाराची आर्थिक घडीही विस्कटली. काहींनी रेल्वे स्थानकावर, रेल्वेतून जाऊन खेळणी, सुय्या, दोरे विकून संसार चालविला होता, मात्र रेल्वेला ही लॉकडाउनचा ब्रेक लागल्यामुळे या बांधवांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद झाले. त्यामुळे त्यांच्यासाठी कोणी आर्थिक, धान्याची मदत देईल का? याकडे त्यांचे डोळे लागले आहेत. 

व्हॉटस्‌ऍप ग्रुपवरून मदतीचे आवाहन 
राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे कोल्हापूर शाखेचे महासचिव शरद पाटील यांनी व्हॉटस्‌ऍप ग्रुपवरून सर्वांना मदतीचे आवाहन केले आहे. सुमारे 40 कुटुंबीयांचा प्रश्‍न आहे. त्यांना औषधालाही पैसे नाहीत. लाखभर रुपयांत या सर्व अंधांच्या संसारात धान्याच्या किटद्वारे, आर्थिक मदतीतून प्रकाश पडू शकतो. या अंधांच्या संसारात प्रकाश टाकण्यासाठी कोण कोण पुढे येणार? हा प्रश्‍न आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Temple closed, train closed, where to sell toys?