टेम्पोचे बोनेट अंगावर पडून चालकाचा जागीच मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 September 2020

टेम्पोचे चालक आणि मालक संतोष देवरट्टी यांनी फुले वाहतुकीसाठी वाहन घेतले होते.

निपाणी : आयशर बोनेट केबिन डोक्यावर पडल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. संतोष लक्ष्‍मण देवरट्टी (वय ३० रा. मोळे, ता. अथणी) असे मृत झालेल्या चालकाचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना पडलिहाळ येथील शेतवडीत शनिवारी (ता. १२) सायंकाळी सहा वाजता घडली.

या बाबत अधिक माहिती अशी, टेम्पोचे चालक आणि मालक संतोष देवरट्टी यांनी फुले वाहतुकीसाठी वाहन घेतले होते. नेहमीप्रमाणे ते शनिवारी (ता. १२) सायंकाळी लखनापूर येथील बाळासाहेब पाटील-स्वामी यांच्या मालकीच्या पडलिहाळ  हद्दीतील शेतातील झेंडूची फुले मुंबई  बाजारपेठेत नेण्यासाठी आयशर टेम्पो घेऊन आले होते. पाटील यांच्या शेतापासून संतोष हे आपला टेम्पोमागे वळवून घेत होते. यावेळी वळण न बसल्याने टेम्पो बंद पडला. त्यामुळे टेम्पोची पाहणी करण्यासाठी चालक संतोष खाली उतरले. यावेळी त्यांनी वाहनाचे बॉनेट उचलले व बंद पडलेल्या टेम्पोच्या मशीनची पाहणी चालवली. यावेळी जोराने उचलले बोनेट परत मागे येऊन संतोष यांच्या मानेवर आदळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच शेतमालक बाळासाहेब पाटील यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बोनेटखाली सापडलेल्या संतोष यांना बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याची माहिती पोलिसांना समजताच मंडल पोलिस निरीक्षक संतोष सत्यनायक, बसवेश्वर चौक पोलिस ठाण्याचे प्रभारी उपनिरीक्षक बी. एस. तळवार यांनी भेट देऊन  पंचनामा केला.

हे पण वाचावाढदिवसाच्या शुभेच्छा न दिल्याने पत्नीला हॉकी स्टीकने मारहाण

 रात्री उशिरा याबाबतची माहिती मृत संतोष यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. त्यानुसार कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार येथील सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून  नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बसवेश्वर चौक पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

हे पण वाचाबाप रे ; चिकन ६५ खाल्ले अन् पैसे मागितले म्हणून फुकट्यांचा तलवारीने हल्ला

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tempo driver dead in belgaum nipani