दहा वर्षे असणाऱ्या जमिनी होणार कुळांच्या नावे 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

महाराजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यात यावर्षी "महसूल लोकजत्रा' मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्‍न सोडवले जाणार आहे

कोल्हापूर : जिल्ह्यातील कलम 43 च्या अटीस पात्र असणाऱ्या आणि ज्या कुळांच्या जमिनींना 10 वर्ष पूर्ण झाल्या आहेत. अशा जमिनी 40 पट शेतसारा भरुन वर्ग एकच्या करुन घेता येणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासन आणि महसूल विभागाने पुढाकार घेतला आहे. 

दहा वर्षापूर्वी "कलम 32 ग' नूसार जे कुळ संबधित जमिनीचे मालक झाले होते. तरीही त्याची अमलबजावणी झाली नव्हती. महाराष्ट्रात पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनासोबत घेवून याची अमलबजावणी सुरु केली आहे. दिवाळीपूर्वी हे काम पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना यंदा खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करता येणार असल्याचे चित्र आहे. 

महाराजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यात यावर्षी "महसूल लोकजत्रा' मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्‍न सोडवले जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी, सर्कल, तहसीलदार, प्रांताधिकरी व महसूल कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रशिक्षण घेऊन ही मोहिम राबविण्याबाबत मार्गदर्शन केले. ज्या जमिनीच्या संबंधात तिच्या खरेदीच्या किंवा विक्रीच्या तारखेपासून दहा वर्ष झाली असतील, अशा जमिनी संबंधित कूळधारकाच्या नावावर केली जाणार आहे. 
जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, ""जिल्ह्यात महसूल लोकजत्राच्या माध्यमातून लोकांची कामे जलदगतीने झाली पाहिजेत. यासाठी विविध विषय घेऊन मोहिम राबवली जात आहे.

हे पण वाचाधक्कादायक; 64 लाखांच्या दागिन्यांना चुना ; विक्रीच्या बहाण्याने कृत्य

जिल्ह्यातील 116 विषय घेऊन नागरिकांचे प्रश्‍न सोडवले जाणार आहेत. प्रशासनाच्या कामात लोकाभिमुखता, गतीमानता, पारदर्शीपणा, सुसुत्रता, सुलभता येण्यासाठी व नागरिकांचे प्रश्‍न तात्काळ निकाली काढण्यासाठी आणि महसूलवाढीसाठी सामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या कामकाजाशी महाराजस्व अभियांनातर्गत महसूल लोकजत्रा ही मोहिम सर्वप्रथम जिल्ह्यात सुरू केली आहे.''या वेळी उपस्थित सर्वांनी सकारात्मक होकार देवून मोहिम यशस्वी करण्याचा निर्धार केला. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten years of land will be in the names of clans