पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात शिरले अन् वृद्धेच्या अंगावरील दागिने पळवले

ऋषिकेश राऊत
Thursday, 18 February 2021

वृद्ध महिलेवर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

इचलकरंजी (कोल्हापूर) : चोरट्यांनी भरदिवसा शुक्रवारी भोने माळ परिसरातील एका घरात जबरी चोरी केली. घरात असणार्‍या वृद्ध महिलेचे हात-पाय बांधून मारहाण करून अंगावरील पाच तोळे दागिने लंपास केले. दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. वृद्ध महिलेवर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घडलेली घटना अशी, विमल पाटील या वृद्ध महिला आपल्या दोन मुलींसोबत भाड्याने भोने मळा येथे भाड्याने राहतात. दोन्ही मुली सकाळी आपल्या कामानिमित्त घराबाहेर पडल्या. गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती त्यांच्या घरी आले. काहीतरी काम असल्याचा बहाणा करत विमल पाटील यांच्याकडे दोघांनी पाणी मागितले. त्यानंतर विमल पाटील या स्वयंपाक घरातून पाणी घेऊन बाहेर आल्यानंतर पाणी पिऊन दोन अज्ञात व्यक्तीने त्यांना ओढत स्वयंपाक घरात नेले. त्यानंतर घरातील कपड्याच्या साहाय्याने त्यांचे हात पाय बांधले व अंगावरील सर्व दागिने लंपास केले. दाट लोकवस्तीच्या ठिकाणी झालेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा - कोल्हापूरची पोर ब्रिलियंटच : सी.एमध्ये यशस्वी होणाऱ्यांच्या संख्येत वाढ

 

संपादन - स्नेहल कदम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: theft from thief in kolhapur ichalkaranji women injured in attack