मुंबईहून ते आले, वेशीवर गाव जमले 

मुंबईहून ते आले, वेशीवर गाव जमले 

सेनापती कापशी : तमनाकवाडा (ता. कागल) येथे मुंबईहून थेट गावाकडे एक कुटुंब आले आणि ग्रामस्थांत अस्वस्थता पसरली. गावच्या वेशीवर बसलेल्या नियंत्रण समिती आणि तरुणांनी त्यांना गावात प्रवेश नाकारला. मात्र, पुन्हा कोल्हापूर येथे जाऊन "होम क्वारंटाइन' पत्र आणल्यावर त्यांना प्रवेश दिला. मात्र, काल (ता. 25) येथे दिवसभर गोंधळ उडाला. 


तमनाकवाडा हे गाव कर्नाटक सीमेपासून जवळ असल्याने येथे वेशीवर नोंदणी करून अत्यावश्‍यक सेवेलाच प्रवेश सुरू होता. काल दुपारी बाराच्या सुमारास येथे एक कुटुंब मुंबईहून आले. त्यांच्याकडे दिव्यांगांच्या सोयीसाठी म्हणून मुंबई पोलिस उपायुक्तांचे पत्र होते. "महाराष्ट्र शासन' अशा लिहिलेल्या चारचाकी वाहनातून ते आले. त्यामुळे ग्रामस्थ आणि नियंत्रण समितीत गोंधळ निर्माण झाला. आतापर्यंत बाहेरून आलेल्यांना गावात प्रवेश नाकारला होता. त्यांना कोल्हापूरच्या सीपीआरमध्ये पाठविण्यात आले.

त्यांना 14 दिवस क्वारंटाइन केले; मात्र हे कुटुंब मुंबईहून पोलिस परवानगीने आल्याने समितीचा निर्णय होत नव्हता. सरपंच, पोलिसपाटील, ग्रामसेवक, कोतवाल, समितीचे सदस्य आणि पहारा ठेवणारे तरुण आक्रमक झाले. त्या कुटुंबाला "सीपीआर'मधून तपासणी करून येण्याची मागणी केली. ते कुटुंब सदस्यही जिद्दी निघाले. त्यांनी त्वरित कोल्हापूरकडे गाड्या वळविल्या. सीपीआर येथून तपासणी अहवाल, हातावर क्वारंटाइन शिक्का मारून ते साडेचारपर्यंत पुन्हा गावच्या वेशीवर आले. 

या वेळी आरोग्य केंद्राचे दोन डॉक्‍टर उपस्थित होते. त्यांच्यासह सरपंच आणि ग्रामस्थांनी जिल्हा शल्य चिकित्सक, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुरगूड पोलिस यांना मोबाईलवरून कळविले. सर्वांनीच त्यांना घरी क्वारंटाइनसाठी पाठविण्यास सांगितले. त्यांचे घर तमनाकवाडा हद्दीत हणरवाडी रस्त्याला आहे. 13 दिवसांपूर्वी मुंबईतून आलेल्या तरुणाला कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यावर कोल्हापूर, कागल आणि त्यानंतर शाळेत ठेवले होते. तर हे कुटुंब थेट घरी क्वारंटाइन झाल्याने येथे अस्वस्थता पसरली. परिणामी, गावच्या वेशीवर उत्स्फूर्तपणे नोंदीसाठी बसणारे तरुण आता नाराजीने घरी बसले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com