वृद्ध महिलांना गंडा घालणारा पोलिसांच्या जाळ्यात 

राजेश मोरे
Thursday, 19 November 2020

त्याच्याकडून सहा गुन्ह्यांची उकल करत दोन लाखांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले

कोल्हापूर - वृद्ध महिलांना पेन्शन मिळवून देण्याच्या अमिषाने गंडा घालणाऱ्या भामट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. त्याच्याकडून सहा गुन्ह्यांची उकल करत दोन लाखांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले. अटक केलेल्या संशयिताचे नाव विशाल कल्लाप्पा कांबळे (वय 42, रा. यादवनगर, जयसिंगपूर) असे आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वेगवेगळी अमिषे दाखवून वृद्ध महिलांना गंडा घालणाऱ्या भामट्यांचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून शोध सुरू होता. गस्त घालत असताना पथकाला सांगली फाटा येथे रस्त्यात थांबलेल्या वृद्ध महिलांना मोटारसायकलवरून सोडतो असे सांगून भामटा पेन्शन मिळवून देण्याचे अमिष दाखवून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने घेऊन पसार होत असल्याची माहिती मिळाली. हे कृत्य रेकॉर्डवरील गुन्हेगार संशयित विशाल कांबळे करत असल्याची माहिती मिळाली. त्याअनुषंगाने पथकाने त्याला ताब्यात घेतले.

हे पण वाचा - हृदयद्रावक : केवळ उपचार न मिळाल्याने मातेसह बाळाचा मृत्यू

चौकशीत त्याने पन्हाळा येथील वृद्ध महिलेची फसवणूक केल्याची कबुली दिली. त्यानंतर केलेल्या कसून चौकशीत त्याने पन्हाळा, कागल, कुरुंदवाड, जयसिंगपूर, कवठेमहंकाळ अशा सहा गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून सुमारे पावणे पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने व दोन मोटारसायकली असा एकूण 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी सचिन देसाई, आसिफ कलायगार, सुरेश पाटील यांनी केली. संशयित विशालला न्यायालयाने 21 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thief arrested in kolhapur