बापरे ! तीन हजारांवर स्वॅब प्रलंबित

शिवाजी यादव
शनिवार, 23 मे 2020

गेल्या नऊ दिवसांत बाहेरच्या जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने लोक जिल्ह्यात आले. यातही मुंबई, पुणे, सोलापूर अशा कोरोना रेड झोन शहरातून हजारो लोक येथे आले. त्यांची तपासणी जिल्ह्यातील बहुतेक शासकीय रुग्णालयात झाली. यातील बहुतांश जणांचे स्वॅब तपासणीसाठी शेंडापार्कातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले. त्याचे परीक्षण सुरू आहे. 

कोल्हापूर  जिल्ह्यात रेड झोन व बाहेरगावाहून येणाऱ्या बहुतेकांची कोरोना तपासणी होत आहे. त्यामुळे जवळपास 3 हजारांवर स्वॅबचे परीक्षण अजूनही प्रलंबित आहे. अशात 19 कर्मचारी व दोन मशीन एवढीच क्षमता आहे. त्यामुळे दिवसभरात सरासरी शंभरावर स्वॅबचे परीक्षण होत आहे. यात बाहेरून येणाऱ्यांचे लोंढे वाढल्याने त्यांच्या स्वॅब तपासणीचा ताण शासकीय प्रयोगशाळेवर आला आहे. परिणामी क्वॉरंटाईन असलेल्यांसह त्यांच्या कुटुंबीयांची घालमेल सुरू आहे. 
अशात एकाच वेळी बाहेरून येणाऱ्यांची संख्या रोखणे किंवा स्वॅब तपासणीसाठी नवीन पर्याय उभे करणे एवढेच पर्याय आहेत. 
गेल्या नऊ दिवसांत बाहेरच्या जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने लोक जिल्ह्यात आले. यातही मुंबई, पुणे, सोलापूर अशा कोरोना रेड झोन शहरातून हजारो लोक येथे आले. त्यांची तपासणी जिल्ह्यातील बहुतेक शासकीय रुग्णालयात झाली. यातील बहुतांश जणांचे स्वॅब तपासणीसाठी शेंडापार्कातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले. त्याचे परीक्षण सुरू आहे. 
एका दिवसात कमीत कमी 300 ते जास्तीत जास्त 700 स्वॅब तपासणीसाठी येत आहेत. एकाच दिवसात एवढ्या स्वॅबची तपासणी येथे होऊ शकत नाही. म्हणून काही स्वॅब मिरज, पुणे येथील शासकीय प्रयोगशाळेकडे पाठवले गेले. त्याचे अहवाल टप्प्याटप्प्याने येत आहेत. 
वास्तविक या तिन्ही प्रयोगशाळेत स्थानिक स्वॅब येतात. त्याबरोबर परजिल्ह्यातील स्वॅबही तपासणीला येत आहेत. 
यात शेंडापार्क प्रयोगशाळेत कोल्हापूरबरोबर सिंधुदुर्गातून रोज किमान 50 ते 70 स्वॅब येतात. मिरजेतील प्रयोगशाळेत कर्नाटक सीमा भाग, साताऱ्यातूनही स्वॅब येतात, तर पुण्यातील प्रयोगशाळेत पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक स्वॅब येतात. त्या शिवाय सातारा, कराड कोल्हापूर येथून स्वॅब पाठविले जातात. त्यामुळे या तिन्ही प्रयागशाळेत दिवसाला किमान दोन हजार स्वॅब परीक्षणासाठी प्रतीक्षेत आहेत. 
गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरात येण्यासाठी ऑनलाईन परवानगी देणे थांबवले आहे. त्यामुळे स्वॅबची संख्या कमी होत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर प्रलंबित असलेले स्वॅबचे अहवाल येत्या चार दिवसांत मिळू शकतील, अशी अपेक्षा आहे. घेतलेले स्वॅब विशिष्ट फ्रिझर्व्ह प्रक्रियेत असल्याने ते सुरक्षित असून त्यांचे परीक्षण लवकर करण्याचा प्रयत्न आहे. 

पाच तासांत 45 स्वॅबची तपासणी ः वालावलकर 
याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रयोगशाळा वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यानुसार डॉ. अपराजित वालावलकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ""कोल्हापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रयोगशाळेकडे दोन मशीनवर सध्या स्वॅब परीक्षण होते. त्यासाठी पूर्वी सात कर्मचारी होते. नवीन 12 कर्मचारी नियुक्त केले आहेत. स्वॅबची संख्या जवळपास तीन हजारांवर आहे. पाच तासांत 45 स्वॅबची तपासणी होते, त्यामुळे प्रलंबित स्वॅबची तपासणी लवकरच पूर्ण करू.'' 

"क्वारंटाईन' संपले तरी अहवाल नाही 
राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कोविड तपासणी प्रयोगशाळेत बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या आणि स्वॅब घेतलेल्या लोकांचा क्वॉरंटाईन कालावधी संपत आला तरी अहवाल न आल्याने सीपीआर आवारात रुग्णांचे नातेवाईक आणि डॉक्‍टरांत वादावादीचे प्रसंग येत आहेत. रेडझोनमधून आलेल्या सर्वांचेच स्वॅब घेतले आहेत. हे सर्वजण सध्या कोणत्या ना कोणत्या तरी हॉटेलात राहतात. अहवाल लवकर येईल, म्हणून हॉटेल घेतले; पण अहवाल लांबत जाईल, तसा या लोकांचा खर्चही वाढत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three thousand swabs pending in kolhapur