कोल्हापूर : कळंबा जेल मोबाईल प्रकरणी आणखी दोघांना अटक

राजेश मोरे
Thursday, 14 January 2021

कोल्हापुरात आलेला संशयित ऋषिकेश पाटील व इचलकरंजीतील संशयित शुभम ऐवळे या दोघांवर अटकेची कारवाई केली होती. 

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात फेकलेल्या 10 मोबाईल प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी आणखी दोघा संशयितांना अटक केली. ओंकार ऊर्फ मुरली दशरथ गेजगे (वय 22, रा. शहापूर, इचलकरंजी) आणि राजेंद्र ऊर्फ दाद्या महादेव धुमाळ (वय 30, रा. जयसिंगपूर) अशी आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, कळंबा कारागृहात 22 डिसेंबर 2020 ला एका मोटारीतून आलेल्या संशयितांनी 10 मोबाईल, गांजा, पेन ड्राईव्ह, चार्जर कॉड फेकला होता. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने लावून चौघांवर गुन्हा दाखल केला. भिष्म्या ऊर्फ भीमा चव्हाण, राजेंद्र ऊर्फ दाद्या धुमाळ, ऋषिकेश पाटील, जयपाल वाघमोडे आदींचा समावेश होता. आतापर्यंत पोलिसांनी पैलवानकीसाठी कोल्हापुरात आलेला संशयित ऋषिकेश पाटील व इचलकरंजीतील संशयित शुभम ऐवळे या दोघांवर अटकेची कारवाई केली होती. 

हेही वाचा - द्राक्ष बागेवर कामाला गेल्याशिवाय कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही

तपासात संशयित राजेंद्र ऊर्फ दाद्या धुमाळ पोलिसांच्या हाती लागला. मुख्य संशयित भिष्या ऊर्फ भिम्या चव्हाणने कारागृहात फेकण्यासाठी मोबाईल आणले होते. त्याला ताब्यात घेतल्यानंतर हे मोबाईल त्याने कोठून खरेदी केले? की त्याला कोणी दिले? कारगृहात ते कोणासाठी फेकले? या 10 मोबाईलचा कोण आणि कशा पद्धतीने वापर करणार होते? या साऱ्या प्रश्‍नांचा उलगडा होणार आहे. 

खंडेलवालकडून सीमचा वापर

संशयित शुभम ऐवळे व ओंकार ऊर्फ मुरली गेजगे हे एकमेकाचे नातेवाईक आहेत. गेजगे सध्या खूनाच्या गुन्ह्यात कळंबा कारागृहात आहे. संशयित शुभमच्या नावाचे सीमकार्ड गेजगे वापरत होता. मोका अंतर्गत गुन्ह्यातील संशयित विकास खंडेलवाल सध्या याच कारागृहात आहे. त्याने गेजगेकडील या सीमचा वापर केला होता अशी माहिती प्राथमिक तपासात पुढे आली असल्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितले. याची खातरजमा करण्यासह सीमकार्डचा अन्य कोणी वापर केला आहे. याबाबतचा पोलिस तपास करीत आहेत. 

दोन ते तीन महिन्यापासून सीम कारागृहात?

कळंबा कारागृहातील संशयित गेजगेकडे गेल्या दोन ते तीन महिन्यापासून सीमकार्ड होते. संशयित शुभम ऐवळे मार्फत हे सीम एका टेबलावर ठेवण्यात आले होते. तेथून ते कारागृहात पोहचवले गेले. अशी माहिती पुढे प्राथमिक तपासात पुढे आली. त्याची शहानिशा सुरू असल्याचे निरीक्षक जाधव यांनी सांगितले. 

हेही वाचा -  कायद्याची जाणीव जागविणारे म्युझियम 

संशयित ऋषिकेश एक्‍सपर्ट 

कोल्हापुरात पैलवानकीसाठी आलेला संशयित ऋषिकेश पाटीलने चौकशीत एकदाच कारागृहात मोबाईल फेकल्याचे सांगतिले होते. पण अटक केलेल्या शुभमने चौकशीत मोबाईल, गांजा फेकण्याच्या कामात ऋषिकेश हा एक्‍सर्ट आहे. त्याने यापूर्वीही त्याचा वापर केला होता. अशी माहिती पुढे आल्याचे पोलिस निरीक्षक जाधव यांनी सांगितले. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: topic of kalamba jail two more people arrested by police in kolhapur