'या' गावात नाही एकही बेरोजगार तरूण; 'या' व्यवसायातून बनविली गावाची ओळख 

विनायक जाधव
Sunday, 9 August 2020

बेळगावपासून सहा किलोमीटरवर वसलेल्या निलजीत 1200 एकर जमीन असून, 600 एकर गावठाण आहे.

बेळगाव - निलजी छोटेसे हे गाव असले तरी, ग्रामस्थांच्या स्वावलंबी वृत्तीमुळे गावात बेरोजगार तरुण नाहीत. सरकारी नोकरीच्या मागे न लागता प्रत्येकाने आपला व्यवसाय उभा केला आहे. प्रत्येक घरात ट्रक बॉडी बिल्डिंग व्यवसायाशी संबंधित एकतरी व्यक्ती मिळेलच. म्हणूनच निलजीची ओळख "ट्रक बॉडी बिल्डरांचे गाव' अशी आहे. कर्नाटक - महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी ट्रकची "बेळगाव बॉडी' तयार करण्यात निलजीकरांचा सिंहाचा वाटा आहे. 

बेळगावपासून सहा किलोमीटरवर वसलेल्या निलजीत 1200 एकर जमीन असून, 600 एकर गावठाण आहे. निलजी लहान, त्यामुळे शेतीही कमी. सहा महिने काम आणि इतरवेळी बांधकाम व्यवसायात मिळणाऱ्या मजुरीवर 40 च्या दशकात गावातील बहुतेक तरुण आपला संसार करीत. गावातीलच युवक नारायण मोदगेकर मैल दगड रंगवत. त्यातून ट्रक व्यावसायिकांशी ओळख झाली. त्यातून ट्रक पेंटिंगचे काम मिळाळे. 1950 च्या दशकात नारायण यांनी धारवाड रोडवर (जुना पी. बी. रोड) शिवाजी कंपाऊंडमध्ये आपला पहिलावहिला ट्रक बॉडी बिल्डिंगचा व्यवसाय थाटला. परंतु, हाच व्यवसाय पुढे निलजी गावाला वेगळी ओळख देणारा ठरला. 

नारायण यांनी गावातील इतर युवकांना आपल्याकडे कामाला आणले. ते करतानाच त्यांनी शिवाजी कंपाऊंडमध्ये इतर बॉडी बिल्डरांकडेही गावातील युवकांना कामाला लावले. त्यांची ती दूरदृष्टीच होती. व्यवसायात प्रगती झाल्यानंतर त्यांनी निलजीच्या साथीदारांबरोबर धारवाड रोडवरच महाकला कंपाऊंड सुरू केले. निलजीतील युवकांचा बॉडी बिल्डर म्हणून भरणा असलेले हे स्वतंत्र कंपाऊंड ठरले. 1960 च्या दरम्यान हा व्यवसाय सुरू झाला. केवळ दहा वर्षांच्या कालावधीत ही प्रगती होती. सुमारे 25 नवी गॅरेज येथे वसली. सर्व मालक निलजीचे होते. त्यानंतर माणिकबाग कंपाऊंडमध्येही गावकऱ्यांनी जम बसविला. त्यामुळे 70 च्या दशकात निलजीतील प्रत्येक घरात ट्रक बॉडी बिल्डर जन्माला आला. 

सबकुछ
केवळ ट्रक बांधणीचेच काम युवकांनी केले नाही, तर अत्यावश्‍यक साहित्य पुरविणे, त्याची निर्मितीही हाती घेतली. आवश्‍यक रंग, रंगकाम, ट्रकची बांधणी, लोहारी काम, लोखंडी साहित्य पुरविणे आदी व्यवसाय सुरू झाले. निलजी गावात 500 कुटुंबे होती. पैकी अधिकाधिक लोक यात गुंतले. त्याकाळी डीसीसी बॅंकेपासून खासबागपर्यंतच्या धारवाड रोडवर निलजीच्या युवकांनी व्यावसायिक साम्राज्य निर्माण केले. त्यात आजअखेर खंड पडला नाही. आज चौथी पिढी व्यस्त आहे.

बेळगाव बॉडी फेमस 

महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक येथील ट्रक मालक येथे ट्रकची बॉडी बनविण्यासाठी येतात. त्यामुळे तिन्ही राज्यांतील ट्रकच्या बॉडीला "बेळगाव बॉडी' या विशेष नावाने ओळखले जाते. यामध्ये आंध्र, केरळ, तमिळनाडूचा समावेश नाही. कारण त्यांच्या ट्रक बॉडी विशेषरूपाने वेगळ्या आहेत. तमिळनाडू, बेळगाव, पंजाब प्रांतामधील बॉडी यापेक्षा वेगळ्या आहेत.

महाराष्ट्रात अन्यत्रही निलजीकर
 तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांच्या कार्यकाळात मंदी आल्याने ट्रक बांधणीच्या व्यवसायावर संकट आले होते. निलजीतील बहुतेकांना व्यवसाय बंद करावा, असे वाटू लागले. परंतु, तो व्यवसाय बंदऐवजी अन्यत्र सुरू करण्याचा निर्णय काहींनी घेतला. त्यामुळे आज कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा, पुण्यातील आळेफाटा व चाकण, सोलापूर, नगर, धुळे येथे निलजीकरांचे स्वतःचे ट्रक बॉडी बिल्डिंग व्यवसाय आहेत. आजही त्यांची गावाशी असलेली नाळ तुटलेली नाही. 

स्थलांतर 
नवा सुवर्ण चतुष्कोण राष्ट्रीय महामार्ग तयार झाल्यानंतर काहींनी आपला व्यवसाय धारवाड रोडवरून गांधीनगर येथे स्थलांतरित केला. निलजीकरांचा व्यवसाय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर गांधीनगरपासून अलारवाड क्रॉसपर्यंत विस्तारित झाला. धारवाड रोडवरील महाकला कंपाऊंडही याच ठिकाणी स्थलांतरित झाले. निलजीकरांचे येथील हरीकाका कंपाऊंडही आपली विशेष ओळख ठेवून आहे. 

आर्थिक उलाढाल 
निलजीत सध्या स्थायिक असलेले 1200 लोक ट्रक बॉडीच्या व्यवसायात आहेत. गावात 60 ट्रक बॉडी बिल्डर असून, प्रतिमहिना एका बिल्डरकडे किमान दोन ट्रक बांधून होतात. सरासरी विचार करता प्रत्येक महिन्याला चार कोटी 20 लाख रुपयांचा व्यवसाय ट्रक बॉडी बिल्डिंगच्या माध्यमातून निलजीकर करतात.

 हे पण वाचा - एकेकाळी या गावात होता दुष्काळ, पण आज प्रत्येकाच्या घरासमोर आहे रुबाबदार बुलेट 

 

गावात ट्रक बॉडी बिल्डर वाढल्याने 1975 मध्ये ट्रकला लागणारे पत्रे, नटबोल्ड, अँगल, रंग पुरवठा सुरू केला. याच व्यवसायात वाढलो. आज माझा मुलगा व्यवसाय पुढे चालवत आहे. 

- रामचंद्र मोदगेकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य, निलजी

माझे काका हरीकाका कंपाऊंडमध्ये ट्रक बॉडी बिल्डिंग करतात. वडिलांचा व्यवसाय काकतीमध्ये आहे. मी ट्रकसाठी रंग पुरवितो. अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे ट्रकसाठी हवा तो रंग मी तयार करून पुरवू शकतो. पूर्वीपासूनच आमचा ट्रक बांधणीचा व्यवसाय आहे. 

- अमर पाटील, रहिवासी, निलजी 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: truck body building business in belgaum nilji village