गुगल मॅपच्या साहाय्याने घरफोड्या करणारे जेरबंद

अमृत वेताळ
Monday, 26 October 2020

बेळगावात घरफोडी करुन पुन्हा रातोरात कोल्हापूर गाठणाऱ्या वरील दोघा संशयिताबद्दल कॅम्प पोलिसांना माहिती मिळाली

बेळगाव : गुगल मॅपव्दारे उपनगरातील घरांची माहिती घेऊन बंद घरे फोडणाऱ्या कोल्हापूरच्या दोघा अट्टल घरफोड्यांना अटक करण्यात आली आहे. सोमवार (ता.26) कॅम्प पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्याकडून सुमारे 28 लाख 8 हजार रुपये किमतीचे अर्धा किलो सोन्याचे दागिने आणि 11 लाख 50 हजार रुपये किमतीची मोटार असा एकून चाळीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रशांत काशीनाथ करोशी (वय 35, रा. इप्सुरली ता. करवीर जि. कोल्हापूर) आणि अविनाश शिवाजी अडावकर (वय 28, रा. धामणे ता. अजरा जि. कोल्हापूर) अशी संशयितांची नावे आहेत. अशी माहिती पोलीस उपायुक्‍त सी. आर. निलगार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

सोमवार (ता.26) कॅम्प पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकाराशी ते बोलत होते. 20 जानेवारीला आस्टनजान डीअल्मेडा आसीस डिल्मेडा रा. लक्ष्मीटेक नक्षत्र कॉलणी) यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात घरफोडीची फिर्याद दिली होती. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता. पोलिसांनी संशयाने वरील दोघांना ताब्यात घेउन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी चार घरफोड्या केल्याची कबुली दिली. वरील दोघेजण चोरीच्या उद्देशाने गुगल मॅपव्दारे शहराबाहेरील घरांची माहिती घेत होते.

हेही वाचा- साडेतीन हजार कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाच्या पाठपुराव्याबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार -

कोणत्या घरांना कुलूप घातले आहे अशा घरांची स्वत: टेहळणी करत होते. त्यानंतर रात्रीच्यावेळी दर्शनी दरवाजा कडी कोंयडा तोडून आत प्रवेश करत सोन्याचे दागिने आणि मोटारी पळविण्यात सराईत आहेत. चोरी केल्यानंतर ते पुन्हा आपले गाव गाठत होते. मात्र, महामार्गावरुन गेल्यास सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होण्याच्या भीतीने ते आडमार्गाने कोल्हापूर गाठत होते. त्यामुळे तपास पथकाला देखील ते अशा पध्दतीने चकवा देत होते. पोलिसांनी टोलनाक्‍यावरील सीसीटीव्ही कॅमेरे अनेकवेळा तपासून पाहिले. मात्र, त्यात त्यांना काहीच माहिती मिळत नव्हती. त्यानंतर अखेर त्यांना अटक करण्यात पोलीस निरीक्षक डी. संतोषकुमार व त्यांच्या सहकाऱ्यांना यश आले. 

एसीसीबीच्या पथकाची मदत 
बेळगावात घरफोडी करुन पुन्हा रातोरात कोल्हापूर गाठणाऱ्या वरील दोघा संशयिताबद्दल कॅम्प पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार कॅम्प पोलिसांचे एक पथक कोल्हापूरात दाखल झाले. त्यांनी स्थानिक गुन्हे तपास पथकाला (एलसीबी) ही माहिती घेऊन तपासासाठी त्यांची मदत घेतली. दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी संयुक्‍तरित्या तपास मोहिम हाती घेऊन अखेर त्यांच्या मुसक्‍या आवळल्या. 

चार प्रकरणांचा उलगडा 
वरील दोघा संशयिताना ताब्यात घेऊन त्यांना बेळगावात आनण्यात आले. त्यानंतर पोलीस ठाण्यात त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकून चार ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. त्युासार त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

संपादन - अर्चना बनेग

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two arrested in Kolhapur thief Deputy Commissioner of Police c. R. Nilgar at the press conference