esakal | जिच्याकडे गेले आसऱ्याला तिनेच घेतला जीव; दोन मेंढपाळांचा दुर्दैवी अंत
sakal

बोलून बातमी शोधा

two dead in war collapse at belgaum

पावसापासून आपला बचाव करुन घेण्यासाठी दोघेही बकऱ्यांना सोडून नजिकच्या शेतातील पत्र्यांच्या शेडमध्ये शिरले. वादळी वाऱ्यामुळे शेडचे पत्र उडून गेले. त्यामुळे पावसाच्या सरी अंगावर पडू नये, यासाठी दोघेही शेडाच्या कोपऱ्यात बसले होते.

जिच्याकडे गेले आसऱ्याला तिनेच घेतला जीव; दोन मेंढपाळांचा दुर्दैवी अंत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : वादळी पावसामुळे शेतातील पत्र्याच्या शेडची भींत अंगावर कोसळून दोघे मेंढपाळ जागीच ठार झाले. रविवार (ता.10) दुपारी खमकारहट्टीं (ता.बेळगाव) येथे ही दुर्घटना घडली असून कल्लाप्पा सिध्दाप्पा सांबरेकर (वय 45, रा. कोंडूस्कोप्प) आणि परशराम गंगाप्पा शहापूरकर (वय 17, रा. शिंधोळी) असे मयतांची नावे आहे. या घटनेची नोंद हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे. 

याबाबत पोलिसातून समजलेली अधिक माहिती अशी, कल्लाप्पा आणि परशराम हे दोघे मेंढपाळ असून ते आज खमकारहट्टी गावातील शेतवडीत बकरी चारण्यासाठी गेले होते. दुपारी सव्वाएकच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरादार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पावसापासून आपला बचाव करुन घेण्यासाठी दोघेही बकऱ्यांना सोडून नजिकच्या शेतातील पत्र्यांच्या शेडमध्ये शिरले. वादळी वाऱ्यामुळे शेडचे पत्र उडून गेले. त्यामुळे पावसाच्या सरी अंगावर पडू नये, यासाठी दोघेही शेडाच्या कोपऱ्यात बसले होते.

शेडाची भींती मातीने बांधून त्याला सिंमेटचा गिलावा करण्यात आला आहे. पण, पाउस आणि वादळी वाऱ्यामुळे भींत अंगावर कोसळ्याने दोघेही भींतीखाली सापडून जागीच ठार झाले. त्याच परिसरात अन्य काही मेंढपाळ बकरी चारण्यासाठी आले होते. त्यांच्या कळपात या दोघांची बकरी शिरली तरीदेखील दोघांचाही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे संशयाने काहींनी शोधाशोध केली असता काही वेळानंतर घडला प्रकार निदर्शनास आला. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. काहींनी ही माहिती मयतांच्या कुटुंबीयासह पोलिसांना दिली.

हे पण वाचा - महाराष्ट्राहून येणाऱ्यांना 14 दिवस क्वारंटाईन सक्तीचे ; कर्नाटकाचा निर्णय 

हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देउन पंचनामा करत मृतदेह शल्यचिकित्सेसाठी हिरेबागेवाडी येथील शासकीय रुग्णालयात हलविले. पोलीस निरीक्षक एन. एन. अंबीगेर अधिक तपास करीत आहेत. गेल्या आठ दिवसापासून उष्म्यात प्रचंड वाढ झाली आहे. ढगाळ वातावरण देखील असून पावसाने मात्र, हुलकावणी दिली आहे.आज दुपारपासूनच ढग जमून आले होते. तालुक्‍याच्या पुर्व आणि पश्‍चिम भागात दुपारनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहर वगळता ग्रामीण भागाला पावसाने झोडपून काढले.

हे पण वाचा -  बेळगावच्या कोरोनाचे 'हे' आहे नवे कनेक्शन... 

go to top