esakal | सापळा रचून लुटारूंच्या दोन टोळ्या केल्या जेरबंद 
sakal

बोलून बातमी शोधा

Two gangs of robbers arrested in kolhapur

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अजय सावंत व महेश पाटील यांना संशयित "लाला' व "तडवळे' यांची माहिती मिळाली

सापळा रचून लुटारूंच्या दोन टोळ्या केल्या जेरबंद 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - उचगाव रेल्वे पुलासह कोंडिग्रे फाट्यावर व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या दोन टोळींचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. पोलिसांनी दोन्ही टोळीतील दहा जणांना अटक करून सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही कृत्य कामगारानेच साथीदाराच्या मदतीने केल्याचे पुढे आल्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

अटक केलेल्या संशयितांची नावे ः उचगाव रेल्वे पूल लूट प्रकरणातील संशयित सुमित ऊर्फ लाल्या सूर्यकांत खोंद्रे (वय 24), सौरभ ऊर्फ डॅनी धनाजी खोंद्रे (वय 20, दोघे धोत्री गल्ली, शुक्रवार पेठ), रोहन सुहास तडवळे (29 साळोखेनगर, बीएसएनएल कार्यालय परिसर), अमित बाळासाहेब कांबळे (25, मूळ दापोली, पुणे सध्या रा. धोत्री गल्ली, शुक्रवार पेठ), कामगार नारायण ऊर्फ चंद्रकांत सुरेश वडर (वय 20, पाडळकर मार्केट परिसर), सौरभ संजय पाटील (20, कदमवाडी) यांना अटक केली. संशयित उमेल महंमद तांबोळी (रा. पुणे) याचा शोध सुरू आहे. 

तावडे हॉटेल परिसरात ज्ञानराज नारायण नाडर यांचे गोळ्या बिस्किटाचे होलसेल दुकान आहे. ते उचगाव (ता. करवीर) येथे राहतात. ते 2 ऑक्‍टोबरला रात्री दुकान बंद करून भाऊ अबुराज यांच्यासमोबत मोटारसायकलवरून घरी जात असताना लुटारूंनी त्याचा पाठलाग करून रात्री सव्वा दहाच्या सुमारास उचगांव रेल्वे पुलाजवळ मारहाण करून त्यांच्याकडील 1 लाख 45 हजार रोकड लुटून नेली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अजय सावंत व महेश पाटील यांना संशयित "लाला' व "तडवळे' यांची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संभाजीनगर स्टॅंड परिसरात सापळा रचून संशयित सुमित ऊर्फ लाल्या, सौरभ ऊर्फ डॅनी, रोहन, अमित, नारायण ऊर्फ चंद्रकांत, सौरभ अशा सहा संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी पुण्यातील संशयित उमेल तांबोळीच्या मदतीने लूट केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पथकाने 18 हजार रोकडसह तीन मोटारसायकली, मोबाईल असा 1 लाख 5 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित तांबोळीच्या शोधासाठी पथक पुणे येथे पाठविले आहे. 
दरम्यान, सांगली ते इचलकरंजी रस्त्यावरील कोंडिग्रे फाट्याजवळ सांगलीचे व्यावसायिक शेखर जयपाल सिद्धनाळे 12 ऑक्‍टोबरला रात्री घरी जात होते. त्या वेळी तिघा लुटारूंनी त्यांच्याकडील 1 लाख 72 हजार रोकड लुटून नेली. या गुन्ह्याचा छडा इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने लावला. याप्रकरणी पोलिसांनी सनी बाबूराव भोसले (21), आसिफ सलीम मुजावर (21, दोघे रा. इलकरंजी), साहील हबीब फणीबंद (22, कोरोची, हातकणंगले) व ओंकार नंदकुमार हारुगडे (21, रा. इचलकरंजी, मूळ रा. शाहूवाडी) या संशयितांना अटक केली. 
सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सिद्धनाळे यांचा कामगार ओंकार हारूगडे याला पथकाने ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथिदार संशयित सनी, आसिफ, साहिल यांच्या मदतीने लूट केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 1 लाख 51 हजार रोकड, मोटारसायकल, मोबाईल जप्त केला. न्यायालयाने चौघांना कोठडी सुनावली. अटक केलेल्या संशयितांवर यापूर्वी गुन्हे असल्याची माहिती पुढे आली आहे. 

हे पण वाचाअबकारीची मोठी कारवाई ; उसाच्या शेतातून 131 किलो गांजा जप्त

पैलवानकीसाठी कोल्हापुरात 
लूट प्रकरणातील संशयित नारायण ऊर्फ चंद्रकांत वडर हा नाडर यांच्या दुकानात दीड वर्षापासून काम करतो. त्याने दुकानातील उलाढालीची माहिती साथीदारांना देऊन त्यांच्या मदतीने हे कृत्य केले. संशयित अमित कांबळे व उमेल तांबोळी काही दिवसांपूर्वी पैलवानकी करण्यासाठी कोल्हापुरात आले होते, अशी माहिती तपासात पुढे आल्याचे बलकवडे यांनी सांगितले. 

पथकांना 25 हजारांचे बक्षीस 
लुटीचा तातडीने छडा लावणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या दोन्ही पथकांना प्रत्येकी 25 हजाराचे बक्षीस पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जाहीर केले. 

संपादन - धनाजी सुर्वे