प्रियकराने प्रेमच असे केले की, शेवटी नशीबी त्याच्या कोयत्याचे वार आले

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 December 2020

सर्वजण कर्नाटकात पसार झाले होते. जखमी नागेशला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

इचलकरंजी : अनैतिक संबंधातून कोयत्याने केलेल्या हल्ल्यात नागेश सुरेश यमुल (वय ३५, रा. लाखेनगर, जाधव मळा) गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला घरात कोंडून हल्लेखोरांनी पलायन केले. आसरानगर गल्ली क्रमांक सहामध्ये मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. 

याप्रकरणी गावभाग पोलिसांनी राहुल विनोद पाथरवट (वय १९, रा. साईट क्रमांक १०२), नागेश शिवाप्पा हिरीकुरभूर ऊर्फ पुजारी (२१, रा. रायगड कॉलनी, पाटील मळा) आणि एका तरुणीला अटक केली आहे. सर्वजण कर्नाटकात पसार झाले होते. जखमी नागेशला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे.  

हेही वाचा - विजेचे प्रश्‍न व्हॉटसअपव्दारे सोडविणार ;कोल्हापूर जिल्ह्यात दीड हजार जणांचा ग्रुप
 

याबाबत सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी दिलेली माहिती अशी : नागेश व संबंधित तरुणीत गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. त्यातूनच नागेशचे तिच्या घरी येणे-जाणे आहे. मंगळवारी नागेश संबंधित तरुणीच्या घरी गेला होता. तेथून नागेश बाहेर पडताना पाथवरट व त्याच्या मित्राने कोयत्याने त्याच्यावर हल्ला केला. त्यांच्यात झटापटही झाली. हल्लेखोरांनी कोयत्याने नागेशच्या डोक्‍यात, हातावर, चेहऱ्यावर वर्मी घाव घातले. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. दाट लोकवस्ती असलेल्या भागात हा प्रकार घडला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.

हल्लेखोरांनी नागेशला घरात कोंडले. त्यानंतर दरवाजास कडी कोयंडा लावून त्यांनी पलायन केले. नागेश जखमी अवस्थेत खोलीतच सुमारे तासभर पडला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. भागातील नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. गावभाग पोलिसांनी तातडीने नागेशला रुग्णालयात नेले. तिन्ही संशयितांना आज दुपारी पोलिसांनी पकडले. पोलिस उपअधीक्षक बाबूराव महामुनी, जयसिंगपूरचे पोलिस उपअधीक्षक रामेश्‍वर वैजंने यांनी घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा -  लय भारी! कोल्हापुरकराचा हातगाडी ते मर्सडीज बेंझ असा प्रेरणादायी प्रवास

 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two persons attend a murder of person in kolhapur under the love relationship police arrested