साखरेभोवतीच राजकारण; आता सामना रंगणार दोन साखर सम्राटांमध्ये

ओंकार धर्माधिकारी
Saturday, 21 November 2020

पदवीधर मतदारसंघ निवडणूक; पक्षीय लढतीत संस्थांची भूमिका महत्त्वाची 

कोल्हापूर: पुणे पदवीधर मतदारसंघातून यंदा दोन साखर सम्राट विधान परिषदेसाठी नशीब आजमावत आहेत. संग्रामसिंह देशमुख यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळाली; तर अरुण लाड यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. पश्‍चिम महाराष्ट्रातील सहकारी आणि शिक्षण संस्था, नवा पदवीधर मतदार आणि पक्षीय कार्यकर्त्यांची सक्रियता यावरच निवडणुकीतील विजय-पराजय अवलंबून असेल. दोघांमधील लढत अटीतटीचीच असेल, असे सध्या चित्र आहे.

‘महाराष्ट्रात साखरेतून सत्ता येते’ असे विधान माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केले होते. त्यांच्या या विधानाला पुष्टी देणारीच पदवीधरची निवडणूक आहे. अरुण लाड सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे नेतृत्व करतात. संग्रामसिंह देशमुख हे ग्रीन पॉवर शुगर कारखान्याची धुरा सांभाळतात. दोघांनाही सहकार क्षेत्रातील कौटुंबिक पार्श्‍वभूमी आहे. लाड यांनी गेल्या निवडणुकीत अपक्ष राहून ३० हजारांहून अधिक मते घेतली. त्यामुळे यंदा राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या वेळचे उमेदवार सारंग पाटील यांना थांबवून लाड यांना उमेदवारी दिली. 

पदवीधर निवडणुकीचा अनुभव, सहकार क्षेत्रातील भरीव योगदान आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांची फौज त्यांच्या पाठीशी आहे. याशिवाय पश्‍चिम महाराष्ट्रातील रयत शिक्षण संस्था, विवेकानंद शिक्षण संस्था, भारती विद्यापीठ, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांचीही मदत लाड यांना होईल. संस्थात्मक मतदानाच्या बाबतीत पडद्यामागच्या हालचालींवरही बरेच काही अवलंबून आहे. गेल्या निवडणुकीत लाड यांच्यामुळेच सारंग पाटील यांचा पराभव झाला होता. ‘राष्ट्रवादी’चे कार्यकर्ते व स्वतः सारंग पाटील हे विसरून लाड यांचे काम करणार का, असा प्रश्‍नही उपस्थित होतो. भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजप कार्यकर्ते कितपत सक्रिय होतील, याबद्दलही चर्चा आहे. माजी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल भाजप कार्यकर्ते, संघ परिवारात नाराजी आहे. त्याचा फटकाही देशमुखांना बसू शकतो. मात्र, ही नाराजी कशी दूर होते, कार्यकर्ते सक्रिय होतात का यावर देशमुखांची दारोमदार आहे.

हेही वाचा- तरुणांनो सावधान : काही  मिनिटातच खात्यावरून पैसे होतायत गायब -

साखरेभोवतीच राजकारण
पुण्यात शेवटच्या दिवशी वाढलेली मतदारसंख्या, पुण्यातील नामांकित शिक्षण संस्थांचा पाठिंबा, भाजप व संघ परिवाराच्या कार्यकर्त्यांचे जाळे या देशमुख यांच्या जमेच्या बाजू आहेत. लाड यांच्या तुलनेत देशमुख तरुण असल्याने नवमतदार त्यांच्याकडे आकर्षित होईल. लाड आणि देशमुख यांपैकी कोणीही जिंकले तरी साखर उद्योगाभोवतीच इथले राजकारण फिरते, हे अधोरेखीत होणार आहे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two sugar emperors from Pune graduate constituency are trying their luck f