हाताची हळद निघण्या आधीच काळाने घातला युवकावर घाला

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 January 2021

विशालची पत्नी लग्नानंतर माहेरी गेली आहे, ती परत येण्यापूर्वीच पतीच्या निधनाची बातमी तिला ऐकण्याची वेळ आली.

कोल्हापूर:  कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वाघबीळ नजीक  भरघाव ट्रकची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात कसबा बावडा येथील दोन तरूण जागीच ठार झाले. काल मध्यरात्री बाराच्या सुमारास हा अपघात झाला. नितीन आबासाहेब रणदिवे,  वय 30, रा. रणदिवे गल्ली (पुर्व) व विशाल आबासाहेब हाके,  वय 29, रा. कवलापूर जि. सांगली अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. 

 विशाल याचा दहा दिवसापूर्वीच विवाह झाला असून तो बावडा येथे मामाकडे रहायला होता. विशालची पत्नी लग्नानंतर माहेरी गेली आहे, ती परत येण्यापूर्वीच पतीच्या निधनाची बातमी तिला ऐकण्याची वेळ आली.नितीन रणदिवे हा बावडा परिसरातील नावाजलेला क्रिकेटपटू होता, तो विवाहित असून त्याला एक  लहान मुलगा आहे.

नितीन व विशाल हे दोघे काल रात्री 11 च्या सुमारास दुचाकीवरून विशाळगडकडे चालले होते. वाघबीळच्या पुढे आशिष लाॅजच्या समोरील वळणावर त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या भरघाव ट्रकने जोराची धडक दिली त्यात या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने बावडा परिसरावर शोककळा पसरली.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two youths from Kasaba Bawada accident in dead