एका संघर्षमय पर्वाची दुर्दैवी अखेर

प्रतिनिधी
सोमवार, 1 जून 2020

श्री. केसरकर टाकाळा येथील कोरगावकर धर्मादाय संस्था हिंदकन्या छात्रालय परिसरात गेली 35 वर्षांपासून राहात होते. तेथे त्यांचा वृत्तपत्र विक्री व दूध विक्रीचा स्टॉलही आहे. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातही ते वृत्तपत्र विक्री करायचे आणि अंबाबाई मंदिर परिसरातही खेळणी व कॅलेंडर विक्री करायचे. स्वतःसह पत्नी शिवूताई अंध असूनही त्यांनी संसाराचा गाडा नेटाने हाकला. मुलगी संस्कृती पंधरा वर्षांची असून ती सुध्दा त्यांच्या या लढाईची शिलेदार बनली होती.

कोल्हापूर ः ते एक भारी क्रिकेटर; पण नियतीला काही गोष्टी मान्य नव्हत्या. बॉल डोळ्यावर लागला आणि डोळे अधू झाले. हळूहळू दृष्टीहिनता आली आणि मग त्यांची आत्मसन्मानाची लढाई सुरू झाली. ही लढाई त्यांनी तितक्‍याच नेटाने लढली. परंतु, आजच्या वादळी पावसाने त्यांच्या या संघर्षमय पर्वाची दुर्दैवी अखेर केली. ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते सुरेश महादेव केसरकर (वय 58) यांची ही कहाणी. 
श्री. केसरकर टाकाळा येथील कोरगावकर धर्मादाय संस्था हिंदकन्या छात्रालय परिसरात गेली 35 वर्षांपासून राहात होते. तेथे त्यांचा वृत्तपत्र विक्री व दूध विक्रीचा स्टॉलही आहे. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातही ते वृत्तपत्र विक्री करायचे आणि अंबाबाई मंदिर परिसरातही खेळणी व कॅलेंडर विक्री करायचे. स्वतःसह पत्नी शिवूताई अंध असूनही त्यांनी संसाराचा गाडा नेटाने हाकला. मुलगी संस्कृती पंधरा वर्षांची असून ती सुध्दा त्यांच्या या लढाईची शिलेदार बनली होती. आज सायंकाळी तिघेही घरीच होते. त्यांच्या घराशेजारी असणारे झाड वादळी पावसामुळे मुळापासून तुटले आणि घरावर येऊन पडले. पत्र्याच्या छपरातून झाड थेट खाली पडले ते श्री. केसरकर यांच्या छातीवरच. घटनेची माहिती समजताच परिसरातील लोकांनी तत्काळ तेथे धाव घेतली. अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना उपचारासाठी सेवा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, रात्रीच्या सुमारास त्यांच्यावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. 3) सकाळी दहा वाजता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The unfortunate end of a struggling parva