आता शेतकऱ्याच्या बांधावर होणार युरियाचा पुरवठा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 October 2020

सतत युरियाच्या टंचाईच्या तक्रारी येतात. त्यावर तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्याला बांधावरच खत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोल्हापूर : शासनाने जिल्हा परिषद कृषी विभागाला 2020/21 सालासाठी 1 हजार मेट्रिक टन युरिया खताचा बफर स्टॉक मंजूर केला आहे. त्यापैकी जिल्ह्यासाठी 108 मेट्रिक टन युरिया खताचा बफर स्टॉक मंजूर केला आहे. जर शेतकऱ्यांनी एकत्रित येवून गटाने मागणी केली तर त्यांच्या बांधावर हे खत पोहोच केले जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी दिली. कृषी समितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. 

श्री.पाटील म्हणाले, सतत युरियाच्या टंचाईच्या तक्रारी येतात. त्यावर तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्याला बांधावरच खत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ यांच्याकडे 108 मेट्रिक टन साठ उपलब्ध झाला आहे. हे खत थेट बांधावर उपब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांनी एक गट तयार करावा. तसेच आपले नाव, फोन नंबर व मागणी पत्र तयार करुन प्रती युरिया बॅगसाठी 266 रुपये 50 पैसे प्रमाणे रक्‍कम जमा करुन कृषी उद्योग विकास मंडळाकडे भरणा करावी. शेतकरी गटांनी कमीत कमी 10 टन खताची मागणी कृषी सहाय्यक यांच्या मार्फत कृषी विकास अधिकारी तसेच जिल्हा कृषी अधिक्षक़ यांच्याकडे करावी, असे आवाहन श्री.पाटील यांनी यावेळी केले. 

हे पण वाचा आयपीएल बेटींग प्रकरणी आणखी एकाला अटक ; रॅकेटची शक्‍यता

आज झालेल्या कृषी समितीच्या बैठकी सदस्य मनोज फराकटे, शंकर पाटील, हेमंत कोलेकर, कल्पना चौगले, करवीर पंचायत समिती सभापती अश्‍विनी धोत्रे व जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी उपस्थित होते. या सर्वच सदस्यांनी बांधावर युरिया देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Urea will now be supplied to farmers