गिर्यारोहण तंत्राचा वापर करुन जोतिबा महाव्दाराची स्वच्छता

निवास मोटे
Wednesday, 23 September 2020

यंदा ही अडचण ओळखून गिर्यारोहक सूरज ढोली, भिकाजी शिंगे व इतर तरुण कार्यकर्ते गिर्यारोहण तंत्राचा वापर करून महाव्दार, शिखर, नगारखाना स्वच्छता केली. 

जोतिबा : जोतिबा डोंगर येथील वातावरणात दाट धुके, सतत पावसाची रिपरिप यामुळे मंदिराची शिखरे महाव्दारांवरती मोठया प्रमाणात वनस्पती उगवतात. परिणामी, त्यांच्या मुळामुळे या वास्तूंना गळती लागते त्या कमकुवत होतात. यंदा ही अडचण ओळखून गिर्यारोहक सूरज ढोली, भिकाजी शिंगे व इतर तरुण कार्यकर्ते गिर्यारोहण तंत्राचा वापर करून महाव्दार, शिखर, नगारखाना स्वच्छता सुरु केली आहे.

हेही वाचा - कोल्हापुरात इतिहासातील घटनांचा स्पर्श झालेले हळदी गाव 

श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे जोतिबा देवाचे प्राचीन भव्य मंदिराचे दक्षिण, उत्तर असे भव्य महाव्दार आहे. तसेच नगारखाना दिपमाळा पाहावयास मिळतात. सहाजिकच यामुळे मंदिर आणि परिसर शोभून दिसतो. पण पंधरा मार्चपासून जोतिबा डोंगर लॉकडाऊन असल्यामुळे व यंदा पाऊस मोठया प्रमाणात झाल्यामुळे मंदिरावर व ऐतिहासिक वास्तुवरती झाडे-झुडपे वाढून वास्तूचे विद्रुपीकरण झाले होते. प्राचीन वास्तु विद्रुप दिसत आहे, असे या गिर्यारोहकांच्या लक्षात आले. त्यांनी बैठक घेऊन स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला.  

पहिल्या टप्प्यामध्ये जोतिबा डोंगर सेंटर प्लाझा येथील महाद्वार स्वच्छ करणेसाठी महाद्वाराची दक्षिण - उत्तर बाजू याठिकाणी नव्वद अंशामधील भिंतीवर झुडपे वाढली होती ती गिर्यारोहण तंत्राचा वापर करुन काढली. भिकाजी शिंगे यांनी सलग पाच तास महाद्वाराच्या या भिंतीवरील झाडे झुडपे, खुरटे, तणकट काढल्यामुळे महाद्वाराचे मनमोहक दृश्य गावकऱ्यांना पहायला मिळाले. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी या  स्वच्छता मोहिमेचे कौतुक केले आहे. परिसरातील  महाद्वारावरील, प्लास्टिक, बॉटल्स असा एक ट्रॉली भरून कचरा जमा करण्यात आला. औषध फवारणी करण्यात आली. पुढच्या टप्यात  मंदिरासमोरील नगारखाना, दक्षिण दरवाजा व इतर पुरातन वास्तु स्वच्छ करणार आहेत. 

हेही वाचा - मराठा आरक्षणावर चंद्रकांत पाटील म्हणाले, केद्रांच्या दहा टक्के आरक्षणाचा लाभ समाजाला मिळावा 

ही स्वच्छता मोहीम सुरज ढोली यांच्या नेतृत्वाखाली विनोद ढोली, कृष्णात बूने, रोहित ढोली, दीपक ढोली, दिग्विजय उपारी, अमर सातार्डेकर, कृष्णात ढोली, सुरज बुने, शिवतेज ढोली, सायबु नवाळे, प्रविण डबाणे, विनायक बुने, अमर शिंगे, पंढरीनाथ जाधव,  भोला यादव, बालमावळा सूर्यभान ढोली यांनी यांच्या सहकार्याने पार पाडली. 

"जोतिबा डोंगरावर महाव्दारावर झाडे झूडपे मोठया प्रमाणात वाढली होती. देखणे असणारे महाव्दार खराब दिसत होते. गिर्यारोहण तंत्राचा वापर करून हे महाव्दार आम्ही स्वच्छ करून घेतले. इतर दक्षिण उत्तर द्वार नगारखाना या तंत्राचा वापर करून स्वच्छ करणार आहोत."

- सूरज ढोली, गिर्यारोहक व शंभुराजे खेळ विकास मंच, कोल्हापूर 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: use of giryarohan pattern to clean the jotiba temple main gate in jotiba kolhapur