इचलकरंजीत लसीकरणाचा वेग दुप्पट 

पंडित कोंडेकर
Thursday, 8 April 2021

इचलकरंजी शहरात लसीकरणासाठी नवीन सहा केंद्रे वाढविण्यात आली आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत लसीकरणाला मोठी गती आली. लसीकरणाचा वेग दुप्पट वाढला असून, नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

इचलकरंजी : शहरात लसीकरणासाठी नवीन सहा केंद्रे वाढविण्यात आली आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत लसीकरणाला मोठी गती आली. लसीकरणाचा वेग दुप्पट वाढला असून, नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 17 हजार 775 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले. यामुळे पुढील काही दिवसांत लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होणार आहे. 

लसीकरणाबाबत सुरवातीच्या काळात अनेक गैरसमज निर्माण झाले होते. त्यामुळे लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरवली होती. मात्र, नंतरच्या काळात विविध पातळ्यांवरून प्रबोधन करण्यात येत असल्याने गैरसमज दूर होत आहे. त्यामुळे हळूहळू लसीकरणाला वेग येत आहे. शहरात दोन खासगी रुग्णालयांत, तर एक शासकीय रुग्णालय आणि सहा नागरी आरोग्य केंद्रांत लसीकरणाची सोय करण्यात आली. मात्र, नागरिकांचा प्रतिसाद कमी मिळाल्याने प्रशासन चिंतेत पडले होते. त्यामुळे आणखी नवीन सहा केंद्रे सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता. 

दोन दिवसांपासून शहरात आता 12 केंद्रांवर मोफत लसीकरण करण्यात येत आहे. प्रत्येक भागातील नगरसेवक यासाठी विशेष प्रयत्न करताना दिसत आहेत. नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत घेऊन जाण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे दोन दिवसांपासून लसीकरणाला गती आली आहे. गेले दोन दिवस सर्वच केंद्रांवर लसीकरणासाठी रांग लागल्याचे चित्र दिसून येत आहे. लस घेण्यासाठी पालिकेसह विविध पातळ्यांवरील कर्मचारी प्रयत्न करताना दिसत आहेत. 

शहरात वाढत चाललेल्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर लसीकरण हा एक चांगली प्रभावी उपाययोजना आहे. त्यामुळे प्रशासनाकडूनही यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसत आहेत. इचलकरंजीतील सहा नागरी आरोग्य केंद्रांसाठी 49 हजार 89 नागरिकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी आजअखेर 17 हजार 675 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. या मोहिमेत सुमारे 30 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त लसीकरण झाले असून, लसीकरणाला गती आल्याने नजीकच्या काळात लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होईल. 

तुटवडा भासण्याची शक्‍यता 
दोन-तीन दिवसांपासून लसीकरणाला वेग आला आहे. त्यामुळे नागरी आरोग्य केंद्राकडे असणाऱ्या लसीचा साठा संपत आला. केवळ एक- दोन दिवसांचाच साठा आहे. वरिष्ठ पातळीवरून लसीचा साठा उपलब्ध न झाल्यास लसीकरण मोहिमेत खंड पडण्याची शक्‍यता आहे. 

लसीकरण दृष्टिक्षेपात 
1 एप्रिल- 800 
2 एप्रिल- 793 
3 एप्रिल- 833 
4 एप्रिल- 687 
5 एप्रिल- 1277 
6 एप्रिल- 1008 
7 एप्रिल- 1732 
 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaccination rate doubled in Ichalkaranji Kolhapur Marathi News