वेध नवरात्रोत्साचे ;  दुर्गा मूर्ती उंचीचे बंधन नको

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

गणेशोत्सवातील आर्थिक नुकसानीनंतर आता शहरातील मूर्तिकारांना आगामी नवरात्रोत्सव किमान काही आर्थिक आधार देणारा ठरणार आहे.

कोल्हापूर : गणेशोत्सवातील आर्थिक नुकसानीनंतर आता शहरातील मूर्तिकारांना आगामी नवरात्रोत्सव किमान काही आर्थिक आधार देणारा ठरणार आहे. दुर्गामातेच्या मूर्तींचा विचार करता मूर्तींचे साचे गेल्या दिवाळीतच तयार झाले आहेत. त्यामुळे नवरात्रोत्सवात मूर्तींच्या उंचीसह अन्य बंधने लादू नयेत, अशी मागणी आता मूर्तिकारांतून होऊ लागली आहे. 
दरम्यान, राज्यातील मंदिरे खुली करण्याबाबत अद्यापही कोणताच निर्णय झालेला नाही. या निर्णयाकडे मंदिर व्यवस्थापनाचे लक्ष असून, मंदिरे खुली करण्याचा निर्णय झाल्यानंतरही कोरोना प्रतिबंधात्मक नियमांच्या अंमलबजावणीसाठी आवश्‍यक पूर्वतयारी केली आहे. 
शहरातील मूर्तिकारांचा विचार केला तर गेल्या वर्षीच्या महापुराच्या फटक्‍यानंतर यंदाचा गणेशोत्सवही त्यांच्यासाठी आर्थिक संकटात आणणारा ठरला. निम्म्याहून अधिक तयार मूर्ती यंदा शेडमध्येच शिल्लक राहिल्या. प्रत्येक मूर्तीकाराचे सरासरी दीड लाखापासून 15 लाखांपर्यंत आर्थिक नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी महापुराच्या पाण्यात मूर्ती राहिल्याने, तर यंदा चार फुटांच्या मूर्तीचा निर्णय ऐन उत्सवाच्या तोंडावर झाल्याने मूर्तिकारांना या संकटाला सामोरे जावे लागले. त्यामुळे घेतलेल्या हंगामी कर्जाची परतफेड कशी करायची, हा प्रश्‍न सर्वांसमोर आहे. या व्यवसायाला कोणत्याही प्रकारच्या विम्याचे संरक्षण नाही आणि गणेशोत्सवातील आर्थिक नुकसानच 15 ते 18 कोटींवर आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर आता काही मूर्तिकारांसाठी नवरात्रोत्सव थोडा फार आर्थिक आधार देणारा ठरणार आहे. 

दोन वर्षांत मूर्तिकारांचे मोठे नुकसान झाले. किमान नवरात्रोत्सवात तरी कोणतीही बंधने नकोत. कारण आता तेवढाच एक आधार आहे. शासनाने मूर्तिकारांसाठी कर्जमाफीसारखी योजना जाहीर करावी आणि मूर्तिकारांवरील आर्थिक संकट दूर करावे, अशी आमची मागणी आहे. 
- किरण माजगावकर, मूर्तिकार 

राज्यातील मंदिरे लवकरात लवकर खुली करावीत, अशी भाविकांची मागणी आहे. शासन निर्णयानंतरच मंदिरे खुली झाल्यावरही कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांची अंमलबजावणी केली जाईल. नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर येत्या चार दिवसांत देवस्थान समितीची बैठक होणार आहे. 
- महेश जाधव, अध्यक्ष, देवस्थान समिती 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vedha Navratri; Do not restrict the height of Durga idol

टॉपिकस
Topic Tags: