esakal | लॉकडाऊननंतर भाजी मंडई पूर्वपदावर, काश्‍मिरी सफरचंद, कर्नाटकातील पेरुची आवक सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Vegetable Market Reopened After Lockdown Kolhapur Marathi News

कोल्हापूर जिल्ह्याचे लॉकडाऊन संपल्यापासून हळूहळू येथील भाजी मंडईत व्यवहार पूर्वपदावर येवू लागले आहेत. वांग्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे किलोमागे शंभर रूपयांनी दर वाढले आहेत.

लॉकडाऊननंतर भाजी मंडई पूर्वपदावर, काश्‍मिरी सफरचंद, कर्नाटकातील पेरुची आवक सुरू

sakal_logo
By
दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : येथील भाजी मंडईत वांगी, कोथंबिरीची मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने दर वधारले. पालेभाज्यांची वाढलेली आवक कायम राहिल्याने दर स्थिर आहेत. श्रावण महिन्यामुळे फळभाज्यांना मागणी वाढली आहे. फळबाजारात काश्‍मिरहून सफरचंदाची नवी आवक सुरू झाली आहे. कर्नाटकातील पेरु बाजारात दाखल झाला. 

कोल्हापूर जिल्ह्याचे लॉकडाऊन संपल्यापासून हळूहळू येथील भाजी मंडईत व्यवहार पूर्वपदावर येवू लागले आहेत. वांग्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे किलोमागे शंभर रूपयांनी दर वाढले आहेत. पावसाने ओढ दिल्याने कोथंबिरीची आवक घटली आहे. मात्र, मागणी कायम असल्याने दर वाढले आहेत. शंभर पेंढ्यामागे 300 रुपयांनी दर वाढून 1000 रूपयावर स्थिरावला आहे. श्रावण महिन्यामुळे सर्वच फळभाज्यांना मागणी वाढल्याचे भाजीपाला खरेदी विक्री संघाचे महादेव तराळ यांनी सांगितले. 

पालेभाज्यांची गेल्या महिनाभरापासून वाढलेली आवक कायम आहे. लाल भाजी, शेपू 100 पेंढ्याना 500 तर मेथी 700 रुपये असा दर होता. बिन्सचे दर कमी झाले आहेत. हिरवी मिरची, कोबी, दोडका, ढब्बू, प्लॉवर यांचे दर कायम आहेत. लिंबूचे दर मागणी कमी झाल्याने उतरले. शंभर लिंबूना 100 ते 125 रुपये असा दर आहे. फळभाज्यांचा दहा किलोचा दर असा; वांगी 400, टोमॅटो 200, दोडका 400, दिडगा 600, ढब्बू 500, हिरवी मिरची 250, बिन्स 300, कोबी 80, प्लॉवर 200, कारली 300 रुपये. 

फळबाजारात सफरचंदाची नवी आवक सुरू झाली आहे. अद्याप चवीला गोडी कमी असल्याने ग्राहकांचा कल खरेदीकडे नसल्याचे फळविक्रेते गजानन कांबळे यांनी सांगितले. 100 ते 150 असा किलोचा भाव आहे. मोसंबी, डाळिंब 60 ते 80 रूपये किलो आहेत. लगतच्या कर्नाटकातून पेरू फळबाजारात आला आहे. हिडकल प्रकल्प परिसरातील हा पेरु अधिक चवदार असल्याने त्याला मागणी जास्त आहे. 50 ते 70 रुपये किलो असा भाव आहे. अननसाची आवक स्थिर असून 20 ते 30 रुपये असा आकारानुसार दर आहे. केळी 25 ते 30 रुपये आणि जवारी 40 ते 50 रुपये डझन आहेत. पपई 20 ते 30 रुपये दर आहे. 

ओल्या भुईमूगाला मागणी 
भाजी मंडईत गेल्या आठवड्यापासून ओल्या भुईमूगाची आवक सुरु झाली आहे. आवक कमी असली तरी ग्राहकांची मागणी असल्याने दर तेजीत आहेत. दर चांगला मिळू लागल्याने शेतकरी स्वतः विक्री करीत आहेत. 50 ते 60 रुपये किलो असा दर आहे.

संपादन - सचिन चराटी