महावितरणाला धक्का देणारा अपघात ; खांबावरून पडून वायरमनचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

एखाद्या भागात विजपुरवठा खंडीत झाल्यास अथवा काही तांत्रिक कारणांमुळे बिधाड झाल्यास वायरमन मंडळी जीव घोक्‍यात घालूनच काम करतात.

कोल्हापूर - जाधववाडी येथे काल झालेल्या अपघातामुळे महावितरणाच्या लाईनमनची सुरक्षिततता पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. या अपघाताची आता त्रयस्य समितीमार्फत चौकशी होणार आहे. 

कालच्या घटनेमुळे महावितरणाच्या कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली. प्रकाश भोसले यांच्या वीज खांबावरून पडून मृत्यू झाला. महावितरणच्या इतिहासात अशा प्रकारचा अपघात दुर्मिळ समजला जातो. हा इलेक्‍ट्रीकल अपघात नसून तो मॅकेनिकल अपघात असल्याचे मानले जाते. अर्थात चौकशी समितीच्या अहवालातच या बाबी स्पष्ट होतील. तीन लाईन ओढून झाल्यानंतर चौथी लाईन ओढताना हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र ज्या पद्धतीने ही घटना घडली ती महावितरणाच्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने तसेच भोसले यांच्या नातेवाईकांसाठी धक्कादायक अशी होती. 

एखाद्या भागात विजपुरवठा खंडीत झाल्यास अथवा काही तांत्रिक कारणांमुळे बिधाड झाल्यास वायरमन मंडळी जीव घोक्‍यात घालूनच काम करतात. महावितरणच्या स्तरावर सुरक्षेची सर्व साधने पुरविली जातात. प्रत्येक गोष्ट जीवावर बेतणार असल्याने कर्मचारी काळजी घेऊनच काम करतात. वीज ही अत्यावश्‍यक बाब बनली आहे. काही मिनिटांसाठी विजपुरवठा खंडीत झाला तरी अनेकांचा जीव टांगणीला लागतो. महावितरणसमोर सध्या विज बिलाच्या वसुलीचा प्रश्‍न आवासून उभा आहे.

लॉकडाऊनमधील बिलात सवलत मिळाले या आशेवर लोक बसले. आता बिलाची थकबाकी मोट्या प्रमाणावर वाढली आहे. ती वसूल कशी करायची असा प्रश्‍न असताना कालच्या घटनेला अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागले. 

हे पण वाचाकोल्हापूर : इराणी खंणीत तरुण बुडाला ; अग्निशामक दलाची शोधमोहीम

विजेच्या अपघाताच्या प्रमाणात अलीकडच्या काही वर्षात घट झाली होती. त्यामुळे वीज कर्मचारी घेत असलेली खबरदारी आणि त्यांना पुरविली जाणारी सुरक्षिततेची साधने ही कारणे होती. पूर्वी डांबावरून पडून वायरमनचा मृत्यू अशा आशयाच्या बातम्या कानी पडायच्या. 

सकाळी घरातून कामाला निघतानाच वायरमनच्या कुटुंबियाचा जीव टांगणीला लागायचा. विजेचे काम हे धोकादायक असल्याने कधी काय होईल याचा नेम नाही. तरिही लाईनमन खबरदारी घेऊन काम करतात. त्यामुळेच अलीकडे अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wireman dies after falling on pole in kolhapur