कोल्हापूर जिल्हा परिषद मधील 'ती' महिला कोरोना बाधित ; आता त्या 35 कर्मचार्‍यांचा जीव टांगनीला...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जुलै 2020

सोमवारी दिवसभर हे कर्मचारी संबंधित महिला कर्मचाऱ्याच्या स्वॅब बाबत विचारणा करत होते.

कोल्हापूर - जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आज स्पष्ट झाले.या महिलेच्या पतीचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल रविवारी आला आहे. महिला कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसह जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे. ग्राम सडक योजनेच्या कार्यालयात 35 कर्मचारी असून त्या सर्वांचे आज स्वॅब घेतले जाणार आहेत.

जिल्हा परिषद मुख्यालया समोर असलेल्या कागलकर हाऊसमध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यालय आहे.यामध्ये 35 अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. यातीलच एका महिला कर्मचाऱ्याचा पती रविवारी कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे ग्राम सडक योजनेचे कार्यालय सुरू झाल्यानंतर ही माहिती सर्व कर्मचाऱ्यांना समजली. तसेच संबंधित महिला कर्मचाऱ्यांचा स्वॅब घेतल्याचे सांगितल्याने या सर्व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले होते. त्यामुळे सोमवारी सकाळी दहा वाजताच हे कार्यालय बंद करण्यात आले.

वाचा - कोरोना बाधित परप्रांतीयाच्या शोधात पिंजून काढली 'ही' तीन गावे...

सोमवारी दिवसभर हे कर्मचारी संबंधित महिला कर्मचाऱ्याच्या स्वॅब बाबत विचारणा करत होते.मात्र त्याचा अहवाल आला नाही. पुन्हा काल सकाळपासूनच अहवालाबाबत चौकशी सुरू झाली. मात्र दिवसभर काही कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला नाही. काल सायंकाळी मात्र संबंधित महिला कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आणि सर्व कर्मचाऱ्यांची गाळण उडाली.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील सर्व कर्मचाऱ्यांचे स्वॅब बुधवारी घेतले जाणार आहेत. तसेच या सर्व कर्मचाऱ्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे घरात अलगीकरण केले जाणार आहे. दरम्यान कागलकर हाऊस येथेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्हा परिषद हादरून गेली आहे. आजपासून आणखी कडक नियम केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman in Kolhapur Zilla Parishad infected corona positive