कोल्हापूर : शेतमजूर महिलेचा खून ; मानेवर धारदार शस्त्राचे वार 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 January 2021

. दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला

कुरुंदवाड (जि. कोल्हापूर)- शिरढोण (ता. शिरोळ) येथे आज एका शेतमजूर महिलेचा मानेवर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. शोभा सदाशिव खोत (वय 42 रा. कोईक वसाहत) असे तिचे नाव आहे. दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याबाबतची वर्दी स्वप्निल खोत याने कुरुंदवाड पोलिस ठाण्यात दिली आहे. 

दरम्यान, घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, इचलकरंजीचे उपअधीक्षक बाबुराव महामुनी, निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खोत गावापासून एक किलोमीटरवरील राजू मोरडे यांच्या शेतात शेतमजूरीसाठी गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास वैरणीचे गाठोडे घेऊन त्या घराकडे निघाल्या. वाटेत एका शेतात अज्ञाताने त्यांच्या मानेवर पाठीमागून धारधार शस्त्राने वार केला. त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. घटनास्थळी वैरणीचे गाठोडे होते तर हातामध्ये मोबाईल घट्ट पकडलेला होता. 

हे पण वाचा शिवाजी विद्यापीठाचा बरद्वानशी सामंजस्य करार

 

अन्य शेतांवरील महिला परतत असताना त्यांना खोत यांचा मृतदेह दिसला. हा हा म्हणता ही बातमी गावात परसली आणि घटनास्थळी एकच गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी हत्याराचा शोध घेतला; मात्र ते आढळले नाही. कोल्हापूरहून आलेल्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. "स्टेला' श्‍वान घटनास्थळ परिसरातच घुटमळले. खोत यांच्या मागे मुलगा व विवाहित मुलगी आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman murdered in kurundwad kolhapur