
धर्मगुरुंवर हल्ला कोणी व का केला, याबाबतची माहिती रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाही. रात्री उशिरापर्यंत फिर्याद घेण्याचे काम सुरू होते. प्रत्यक्षात धर्मगुरू हे कोल्हापूर चर्च कौन्सिलचे कार्यकारी चिटणीस आहेत.
'ती' त्यांच्यासमोर आली आणि गळयावर वार करून गेली...
कोल्हापूर - कोल्हापूर चर्च कौन्सिलचे कार्यकारी चिटणीस आणि ख्रिस्ती धर्मगुरुंवर आज रात्री नागाळापार्क येथे प्राणघातक चाकू हल्ला झाला. जगन्नाथ आकाराम हिरवे (वय ४८, रा. न्यू शाहूपुरी) असे जखमी धर्मगुरुंचे नाव आहे. एका महिलेने त्यांच्या मानेवर चाकूने वार केल्याचे समजते. त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना सीपीआरमधून खासगी रुग्णालयात दाखल केले. याबाबतची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. लिपिक शमुवेल मधुकर रुकडीकर यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.
खुनी हल्ल्याचे कारण गुलदस्त्यात, दोन शस्त्रक्रिया यशस्वी
पोलिसांनी आणि रुकडीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कौन्सिलच्या कामानिमित्त धर्मगुरू हिरवे दोन कर्मचाऱ्यांसोबत आज इस्लामपूरला गेले होते. तेथून रात्री साडेआठच्या सुमारास ते कोल्हापुरात आले. तेथूनच ते घरी जाणार असल्यामुळे त्यांनी कर्मचाऱ्याला कार्यालयातील बॅग आणण्यासाठी पाठविले.
याचवेळी दुसरा कर्मचारी कुलूप काढण्यासाठी व कार्यालय बंद करण्यास गेला. त्यामुळे ते एकटेच मोटारीत होते. ते स्वतःच चालक होते. नागाळा पार्क कमानीजवळ ते मोटारीत एकटेच असताना अनोळखी महिला त्यांच्यासमोर आली आणि गळ्यावर चाकूने वार करून निघून गेली. धर्मगुरू हिरवे ओरडल्यामुळे दोन्ही कर्मचारी पळत आले. तेव्हा ते रक्ताने माखलेले होते. या वेळी शमुवेल यांनी त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले.धर्मगुरू हिरवे यांच्यावर प्राणघातक हल्ल्यामुळे मानेवर गंभीर दुखापत झाल्याचे सीपीआरमध्ये डॉक्टरांनी सांगितले. या वेळी शमुवेल व इतर सहकाऱ्यांनी सीपीआरमधून खासगी रुग्णालयात दाखल केले. खागसी रुग्णालयात रात्री साडेदहा-अकरापर्यंत त्यांच्यावर दोन छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया केल्याचे सांगितले.
वाचा - शब्बास मर्दा.... तो थेट दवाखान्यातून अॅम्बुलन्समध्ये बसून गेला परीक्षा केंद्रावर....
बांधवांतून संतापाची लाट
धर्मगुरुंवरील हल्ल्यामुळे ख्रिस्ती बांधवांतून संतापाची लाट उसळली आहे. थेट धर्मगुरुंवर हल्ला करण्याचे धाडस कोणाचे झाले त्यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी काही ख्रिस्ती बांधवांनी रुग्णालयात असताना केली. धर्मगुरुंवरील हल्ल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे खासगी रुग्णालयात त्यांना पाहण्यासाठी गर्दी झाली होती.
तपास यंत्रणा कामाला
धर्मगुरुंवर हल्ला कोणी व का केला, याबाबतची माहिती रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाही. रात्री उशिरापर्यंत फिर्याद घेण्याचे काम सुरू होते. प्रत्यक्षात धर्मगुरू हे कोल्हापूर चर्च कौन्सिलचे कार्यकारी चिटणीस आहेत. कौन्सिलच्या कामातील घटनेतून हा हल्ला झाला आहे की त्याला अन्य कोणते कारण आहे, याचा तपास पोलिस करत आहेत.