esakal | मी तुमच्या सोबते येते, बसून राहते म्हणत दिला पतीला हात अन् सुरु केला लेथ मशिनच्या घरघरीत संसाराचा यशस्वी प्रवास

बोलून बातमी शोधा

women day special Sunita Kamate journey from housewife to factory kolhapur marathi news}

सुनिता कामतेंचा गृहिणी ते कारखानदार प्रवास 

मी तुमच्या सोबते येते, बसून राहते म्हणत दिला पतीला हात अन् सुरु केला लेथ मशिनच्या घरघरीत संसाराचा यशस्वी प्रवास
sakal_logo
By
लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : लेथ मशिनचा आवाज सुरू होता. हातातील बांगड्या सावरत आणि कंबरेला पदर खोचून एक महिला उभी होती. एकीकडे जॉबची ऍक्‍युरेसी पाहताना दुसरा हात स्टार्टर बटनवर. त्यांची नजर मात्र जॉबच्या केंद्रबिंदूवर. कपाळावर कुंकू, साधी राहणी आणि स्पष्ट बोलणं हा त्यांचा स्वभाव. मंदीच्या काळात पतीला साथ देणाऱ्या याच रणरागिणीचं नाव सुनिता विनोद कामते. 

त्या सांगतात, ""रहायला जवाहरनगरात. कारखाना वाय.पी.पोवार नगरात. पती विनोद 20 वर्षे कारखानदारीत. मात्र त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, अशी माझी इच्छा. होते नव्हते ते सर्व एकत्रित करून 2005- 06 मध्ये स्वतःचा कारखाना भाड्याच्या जागेत सुरू केला. मात्र पुढे वर्षा-दीडवर्षातच मंदीच्या लाटेने घेरले. चार लेथ मशीन विकावी लागली. कामगार कमी करावे लागले. दिवसभर कारखान्यात बसून रहायचे आणि सायंकाळी घरी यायचे असा पतीचा दिनक्रम सुरू झाला. अखेर त्यांनी कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतला.'' 

हेही वाचा- बहिणीसाठी बनवली इलेक्‍ट्रिक स्कूटर; महिला दिनानिमित्त देणार भेट

"मी तुमच्या सोबते येते, कारखान्यात बसून राहते, पण कारखाना बंद करायचा नाही, असा आग्रह मी पतीकडे धरला. पहिले एक-दोन दिवस रिकामेच गेले. पण तिसऱ्या- चौथ्यादिवशी कामे येवू लागली. कामगार कोणीही नव्हते म्हणून मी त्यांना हातभार लावला आणि मी थेट लेथ मशिनसमोर उभी राहिले. "वर्म थ्रीडींग'चे काम करण्यासाठी कोकणात (मालवण) तीन दिवस लागत होते. मात्र तेच काम मी एक दिवसांत करून दिले. एका स्पिनिंग मिलमधील काम पूर्ण करायचे होते. त्यामुळे आम्ही दोघांनी मध्यरात्री दोनपर्यंत न थांबता काम पूर्ण केले. 

पहाटे साडेचारला दिवस सुरू होतो. घरची कामे आवरून नऊला कारखान्यात येते. कौशल्य आणि बिनचुकतेमुळे विविध ठिकाणाहून कामे येवू लागली आहेत. "वृंदावन' हे मुलाचे नाव कंपनीला दिले आहे. मंदिचे दिवस संपले आणि आता चार मशिन आहेत. 

संपादन-अर्चना बनगे