फोटोग्राफी क्षेत्रात कर्तृत्व गाजवणारी बेळगावची नवदुर्गा

महेश काशीद
Tuesday, 20 October 2020

आवडीचे क्षेत्र निवडल्यास नक्कीच आत्मविश्‍वास द्विगुणित होतो अन्‌ यशालाही गवसणी घालता येते

बेळगाव : पुरुषांची मक्‍तेदारी असलेल्या विविध क्षेत्रांत महिलांनी कर्तृत्वाच्या जोरावर आपली छाप पाडली आहे. फोटोग्राफी क्षेत्रही यापैकीच एक आहे. या क्षेत्रात बेळगावच्या तृप्ती कामत यांनी पदार्पण करत केवळ कौशल्य आत्मसात न करता भक्कम पायाही रोवला आहे. आवडीचे क्षेत्र निवडल्यास नक्कीच आत्मविश्‍वास द्विगुणित होतो अन्‌ यशालाही गवसणी घालता येते, हे तृप्ती यांनी यातून दाखवून दिले आहे.

हेही वाचा - फटाक्‍यांचा धूर कोरोनामुक्तांना घातक;  दिवाळीनंतर दुसरी लाट येण्याची भीती कायम -

रानडे रोड, टिळकवाडीतील तृप्ती यांचा आरपीडी क्रॉस येथे कामत फोटो एक्‍स्प्रेस नावाने फोटो स्टुडिओ आहे. २०१६ पासून त्या स्टुडिओ चालवितात. तृप्ती यांचे वडील शशिकांत कामत व त्यांच्या मित्रांनी मिळून स्टुडिओ सुरू केला होता. शशिकांत यांना फोटोग्राफीचे कौशल्य नव्हते. ते केवळ भागीदार म्हणून व्यवसायात उतरले. दरम्यान, त्यांची भागीदारी तुटल्यानंतर व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर होता. 

यामुळे तृप्ती यांनी स्टुडिओची जबाबदारी स्वीकारली. सुरुवातीला त्यांना छायाचित्र टिपण्याचे कौशल्य नव्हते. मात्र, या क्षेत्रातील बारकावे टिपत त्यांनी फोटोग्राफीचे कौशल्य आत्मसात केले. त्यातून त्यांनी एक्‍स्प्रेस स्टुडिओलाही बळ देत स्वत:ची टीम तयार केली. सध्या चार ते पाच जण मिळून ऑर्डर स्वीकारून काम करत आहेत. तृप्ती यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण डीपी स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्समधून बीकॉमपर्यंतचे शिक्षण घेतले.

छायाचित्रकार म्हणजे पुरुष असे समीकरण होते. मात्र, या विचारसरणीला तृप्ती यांनी छेद देत स्वतःला व्यावसायिक छायाचित्रकार म्हणून सिद्ध केले. छायाचित्रकार म्हटल्यानंतर काही वेळा रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते. त्यामुळे सुरवातीला थोडीशी भीती वाटायची; पण घरच्यांची साथ लाभल्यामुळे आव्हानांना यशस्वीपणे तोंड देऊन यशस्वी झाल्याचे तृप्ती सांगतात.

हेही वाचा - दिव्यांग सुप्रियाची जिद्द ; मटेरिअलच्या ऑनलाईन विक्रीतून झाली आत्मनिर्भर -

"स्पर्धा सर्व ठिकाणी आहे; पण ज्यांची ‘हटके इमेज’ आहे तेच टिकत आहेत. नवीन मोबाईल, ॲपमुळे छायाचित्र क्षेत्रात आव्हाने आहेत; परंतु या पलीकडे जाऊन ज्यांनी आपले काम दाखविले, त्यांना निश्‍चितच यश मिळत आहे. भविष्यात पुणे, मुंबईतील फोटो शूट बेळगावात आणण्यासाठी कौशल्य आत्मसात करत आहे." 

- तृप्ती कामत, छायाचित्रकार

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women handle the photography business in belgaum special story for navdurga by mahesh kashid