स्लो इंटरनेटमुळे "वर्क फॉर्म होम'ला कासवाची गती

अजित माद्याळे
Wednesday, 25 November 2020

कोरोनामुळे आयटी, सॉफ्टवेअर कंपन्यांतील कर्मचारी आणि विद्यार्थी हे घटक सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन आहेत. परंतु, सगळ्याच कंपन्यांचे इंटरनेट स्पीड ग्रामीण भागात कासवगतीने सुरू असल्याने हे घटक त्रस्त झाले आहेत.

गडहिंग्लज : कोरोनामुळे आयटी, सॉफ्टवेअर कंपन्यांतील कर्मचारी आणि विद्यार्थी हे घटक सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन आहेत. परंतु, सगळ्याच कंपन्यांचे इंटरनेट स्पीड ग्रामीण भागात कासवगतीने सुरू असल्याने हे घटक त्रस्त झाले आहेत. कंपन्या ग्राहकांच्या गळ्यात इंटरनेट पॅक घालून मालामाल झाले आहेत, तर दुसऱ्या बाजूला हजारो रुपयांची गुंतवणूक करूनही आवश्‍यक त्या गतीने इंटरनेट नसल्याने "नेट'करी कंगाल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

कोरोनाचा परिणाम सर्वच क्षेत्रावर "न भुतो..' असा झाला. लॉकडाउनमुळे पुणे, मुंबई, बंगळूर आदी मेट्रोसिटीत विविध आयटी आणि सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गाव गाठले. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना "वर्क फॉर्म होम' दिले. काही कंपन्या मार्च, तर काहींनी जूनपर्यंत कर्मचाऱ्यांना कंपनीकडे न बोलवण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे ग्रामीण भागातील हे कर्मचारी घरी आल्यानंतर विविध मोबाईल कंपन्यांचे इंटरनेट पॅक खरेदी करून "वर्क फॉर्म होम' करत आहेत. काहींनी डोंगल घेतले तर काहींनी राऊटर खरेदी केले. सुरूवातीला स्पीड चांगले मिळाले. परंतु, हळूहळू ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागल्याने टॉवरच्या क्षमतेपेक्षा अधिक कनेक्‍शन झाले. टॉवरची मर्यादा ओलांडून गेल्याचा परिणाम इंटरनेट स्पीडवर होवू लागला आहे. 

वर्क फॉर्म होमच्या कर्मचाऱ्यांना याचा नाहक फटका बसत आहे. कामाबाबत विचारणा करण्यासाठी कंपन्यांच्या ऑफीसमधून वारंवार कॉल येत आहेत. परंतु कंपनीला रोजचे कारण सांगायचे काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. इंटरनेट पॅकवर हजारो रूपये खर्च करून काहीच उपयोग होत नसल्याने ते त्रस्त झाले आहेत. प्रत्येक कंपनीची ही अवस्था आहे.

ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काहीच समजेनासे झाले आहे. कासवगतीच्या इंटरनेटमुळे मध्येच व्हीडीओ बंद पडतो. हा प्रकार शिक्षणात अडसर ठरत आहे. एकीकडे शाळा सुरू व्हायचा पत्ता नाही. कसेबसे ऑनलाईन शिक्षण विद्यार्थी घेत असले तरी त्यात इंटरनेटचा अडथळा येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकही वैतागले आहेत. आता या प्रश्‍नात लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची वेळ आली आहे. 

निवृत्त अधिकाऱ्याची धडपड 
तालुक्‍यातील जखेवाडीसारख्या छोट्या गावात 11 ते 12 तरूण "वर्क फॉर्म होम' करीत आहेत. तालुक्‍यातील प्रत्येक गावात अशा तरूणांची कमीजास्त संख्या आहे. या तरूणांना स्लो इंटरनेट स्पीडचा मोठा त्रास होत आहे. जखेवाडी तरूणांकडून हा प्रश्‍न समजल्यानंतर टीसीएस कंपनीतून मॅनेजर पदावरून निवृत्त झालेले सुरेश पाटील यांनी विविध कंपन्यांची दारे ठोठावली. परंतु, कंपन्याच्या प्रतिनीधीकडून समाधानकारक उत्तरही नाही आणि कार्यवाहीही झाली नसल्याचे पाटील यांनी सांगितले. 

ऑनलाईन शिक्षणात खंड
मी ऍकॅडमीत शिकणारी विद्यार्थीनी आहे. कोरोनामुळे प्रत्यक्ष वर्ग बंद असल्याने ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. परंतु, इंटरनेट स्पीड मिळत नसल्याने मध्येच व्हीडीओ बंद पडत आहे. याने ऑनलाईन शिक्षणात खंड पडत आहे. 
- तृप्ती पाटील, गिजवणे

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Work Form Home Slowed Down Due To Lack Of Internet Kolhapur Marathi News