esakal | सरोजिनी बाबर यांचे कार्य, संशोधन आणि लेखन या पुस्तकाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशन संपन्न
sakal

बोलून बातमी शोधा

 Work Research and Writing of Sarojini Babar book published at Shivaji University

सरोजिनी बाबर यांच्याकडून लोकज्ञानाचे
हयातभर संकलन : डॉ. राजन गवस

 

सरोजिनी बाबर यांचे कार्य, संशोधन आणि लेखन या पुस्तकाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशन संपन्न

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - ''लोकसाहित्य हे लोकज्ञान मानून या ज्ञानाचे संकलन करण्याच्या कामी डॉ. सरोजिनी बाबर यांनी हयात वेचली. त्यांच्या कार्याविषयी शिवाजी विद्यापीठामार्फत पुस्तक प्रकाशित होणे ही महत्त्वाची बाब आहे,'' असे प्रतिपादन डॉ. राजन गवस यांनी केले.

डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट येथे कार्यरत असणाऱ्या डॉ. वैशाली भोसले यांनी संपादित केलेल्या 'सरोजिनी बाबर : कार्य, संशोधन आणि लेखन' पुस्तकाचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठात झाले. विद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण अध्यासन आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनतर्फे कार्यक्रम झाला. कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के अध्यक्षस्थानी होते.

डॉ. गवस म्हणाले, "सरोजिनी बाबर यांनी समाजात प्रचलित असणारी अनेक गीते, त्यातील लोकज्ञान वेचण्यासाठी, संकलित करण्यासाठी आयुष्यभर संशोधन कार्य केले. त्यापुढे जाऊन बुरसटलेल्या समाजाला जागृत करीत राहण्याचे काम केले. जीवनात अनेकविध जबाबदाऱ्या पेलत असताना सातत्याने त्यांनी बहुजन समाजाचे सांस्कृतिक, साहित्यिक प्रतिनिधित्व केले. या त्यांच्या योगदानाची दखल घेऊन विद्यापीठाने चर्चासत्रे आयोजित केली. तसेच हे पुस्तकही साकारले, ही समाधानाची बाब आहे. यापुढील काळातही अशाच दर्जेदार ग्रंथनिर्मितीसाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा,''

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, "गोरगरीब, शेतकऱ्यांविषयी प्रचंड कळकळ व आस्था बाळगून त्यांच्यासाठी, त्यांच्यामधीलच लोकसाहित्याचे कण वेचून सरोजिनी बाबर यांनी मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या योगदानाची अतिशय उत्तम दखल या पुस्तकात घेतली. पुढच्या अनेक पिढ्यांना ते मार्गदर्शक स्वरुपाचे आहे. विशेषतः शेतकऱ्यांच्या मुलांनी, महिलांनी सरोजिनी बाबर यांच्या योगदानाप्रती कृतज्ञ राहावे, अशी त्यांची कामगिरी आहे. त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक योगदानाचा यथोचित वेध घेतला जाणे आवश्‍यक आहे.''

कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ.पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर, डॉ.गवस यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. सरोजिनी बाबर यांच्या भगिनी कुमुदिनी पवार उपस्थित न राहू शकल्याने त्यांच्या शुभसंदेशाची ध्वनिचित्रफीत दाखविली. यशवंतराव चव्हाण स्कूलचे संचालक डॉ. प्रकाश पवार यांनी स्वागत केले. वैशाली भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. सहसंपादक मृणालिनी जगताप यांनी आभार मानले. महर्षी वि.रा.शिंदे अध्यासनाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे, डॉ.नंदकुमार मोरे, डॉ. नितीन माळी, डॉ. अमोल मिणचेकर, डॉ.संतोष सुतार, डॉ.कविता वड्राळे, किरण गुरव आदी उपस्थित होते.

संपादन - मतीन शेख

go to top