esakal | किणी-कर्यात भागात जोकमाराच्या जगाचे पुजन, वाचा नवव्या शतकापासून सुरू झालेल्या परंपरे विषयी
sakal

बोलून बातमी शोधा

Worship Of Jokmara In Chandgad Taluka Kolhapur Marathi News

किणी-कर्यात (ता. चंदगड) भागात सद्या गावोगावी जोकमार देवाचा जग (मुखवटा) फिरवला जातो. इसवी सनाच्या नवव्या शतकापासून सुरू झालेली आदिवासी समाजाची ही परंपरा आजही या विभागात जोपासली जात आहे

किणी-कर्यात भागात जोकमाराच्या जगाचे पुजन, वाचा नवव्या शतकापासून सुरू झालेल्या परंपरे विषयी

sakal_logo
By
सुनील कोंडुसकर

चंदगड : किणी-कर्यात (ता. चंदगड) भागात सद्या गावोगावी जोकमार देवाचा जग (मुखवटा) फिरवला जातो. इसवी सनाच्या नवव्या शतकापासून सुरू झालेली आदिवासी समाजाची ही परंपरा आजही या विभागात जोपासली जात आहे. 

शिव-पार्वतीचा तिसरा पुत्र म्हणून हे लोकदैवत महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, उत्तर कर्नाटक भागात पुजले जाते. या दैवताचे आदिवासी वारली जमातीच्या "नारनदेव'शी साधर्म्य आहे. एका आख्यायिकेनुसार भाद्रपद अष्टमीला कुंभाराच्या घरी जोकमाराचा जन्म होतो. त्याचे पालन-पोषण, गावोगावी फिरवणे व आराधना आदिवासी कोळी जमातीच्या घरी होते, तर पौर्णिमेला परीट समाजाच्या घरी मृत्यू होतो.
 
जोकमार, जोक्‍या, जोकाप्पा, जोकमार स्वामी अशा विविध नावांनी त्याला ओळखले जाते. बहुजन, कष्टकरी व शेतकऱ्यांचा देव म्हणून त्याची ख्याती आहे. 
गणेशोत्सवाला लागूनच जोकमाराचा सण सुरू होतो. दणकट शरीरयष्टी, पिळदार मिशा, कपाळावर भस्म, उजव्या हाती तलवार, तोंडात लोण्याचा गोळा अशा शारिरीक वर्णनाचा जोकमार वेताच्या बुट्टीत, कडुनिंबच्या पानात बसवून गावागावातुन फिरवला जातो.

भाविक भक्तीभावाने त्याचे दर्शन घेतात. पुजारी महिलांना शिधा देतात. बुक्कीहाळ येथील शांता परशराम पाटील, सुशव्वा हणमंत पाटील व कोवाड येथील अव्वाका गुरव या आदिवासी महादेव कोळी जमातीच्या महिलांकडून कर्यात भागातील गावोगावी जोकमाराचा मुखवटा फिरवला जात आहे. त्याच्याकडे पाऊस चांगला पडावा, पीक-पाणी उदंड व्हावे, गावावर कोणतेही संकट येऊ नये, अशी मागणी केली जाते.

कितीही दुष्काळाचे सावट असले जोकमार येऊन गेल्यावर हमखास पाऊस पडतो अशी लोंकांची धारणा आहे. सद्या मात्र या विभागात नागरीक अति पाऊस, महापूर आणि कोरोना महामारीने त्रस्त आहेत. ही संकटे लवकर दूर व्हावीत अशी सर्वांची जोकमाराकडे मागणी आहे. या परिसरात हा श्रध्देचा विषय आहे. 

संपादन - सचिन चराटी