
तुरुकवाडीत पार पडले कुस्ती मैदान ; 'कुस्ती हेच जीवन' महासंघाकडून आयोजन
कोल्हापूर - तुरुकवाडी ता.(शाहूवाडी) येथे 'कुस्ती हेच जीवन' महासंघाच्या वतीने राज्यातील पहिले अधिकृत ऑनलाईन कुस्ती मैदान पार पडले.जिल्हा प्रशानस तसेच राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित केली होती.कोरोना महामारीमुळे जिल्ह्यातील मल्लांचा थांबलेला शड्डू या मैदानाच्या निमित्ताने पुन्हा घुमला.कुस्ती मैदाने सुरु झाल्याने मल्ल तसचे कुस्तीशौकींनामध्ये नवचैतन्य संचारलेले यावेळी पाहायला मिळाले.
मैदानात प्रथम क्रमाकांच्या लढतीत विकास पाटील (मांगरूळ) विरूद्ध सुदेश ठाकुर (सांगली) या अटीतटीच्या लढतीत सुदेशने गुणावर विजय संपादन केला. दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीत उदय खांडेकर (वारणानगर) विरूद्ध अजित पाटील (कोल्हापुर) लढतीत अजित ने पहिला गुण घेतल्याने पंचानी त्यास विजयी घोषित केले. तर तिसऱ्या क्रमाकांच्या लढतीत अमर पाटील (कोल्हापुर) याने प्रदीप ठाकुर (सांगली) यास छडी टांग डावावर आस्मान दाखवत मैदानातील प्रेक्षकांची वाहावा मिळवली.इतर पंचवीस चटकदार कुस्त्या मैदानात पार पडल्या.यावेळी विजयी मल्लाना प्रताप कदम यांच्याकडून चषक देण्यात आले.
वाचा - कुस्तीतील लाईव्ह कॉमेंट्री कशी करतात तुम्हाला माहित आहे का ? जाणुन घ्या...
या मैदानासाठी दत्त उद्योग समुहाचे संस्थापक आनंदराव माईगडे, कोल्हापुर जिल्हा परिषदेचे सभापती हंबीरराव पाटील,जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव पाटील, ऑलिम्पिकवीर बंडा पाटील रेठरेकर,राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते राम सारंग, उप - महाराष्ट्र केसरी शिवाजी लाड, सभापती जालिंदर पाटील,सुरेश जाधव, विकासराव पाटील,तानाजी चवरे प्रमुख उपस्थित होते.
फडातच घेतली डोपिंग विरोधी शपथ...
डोपिंगने कुस्ती क्षेत्र ग्रासल्याचे तसेच स्टेरॉइडच्या पकडीत पैलवान येत असल्याच्या समस्येवर दै.सकाळने वृत्त मालिका प्रसिद्ध करत प्रकाशझोत टाकला होता.याला प्रतिसाद देत कुस्ती हेच जीवन महासंघाने डोपिंग बद्दल जनजागृतीची मोहिम हाती घेतली आहे.मैदानात डोपिंगला हद्दपार करण्याची प्रतिज्ञा सर्व मल्ल,प्रशिक्षक तसेच मल्लांच्या पालक मंडळीकडून यावेळी घेण्यात आली.
10 हजार प्रेक्षकांनी पाहिले थेट प्रक्षेपण...
कोरोना संसर्गामुळे शासनाच्या नियमानुसार प्रेक्षक विरहीत स्पर्धा घेण्यात आली.मैदानातील लढतीचे युट्यूब तसेच फेसबुक वर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले.तब्बल 10 हजार लोकांनी याचा लाभ घेताला.राज्यातील हे पहिलेच अधिकृत ऑनलाईन मैदान ठरले.