या गड-किल्ल्यांवर शतदा प्रेम करावे ! 

अजित माद्याळे
Monday, 17 February 2020

व्हॅलेंटाईन डे' म्हटलं की प्रियकर, प्रेयसी यांच्यासह आपल्या आवडत्या व्यक्तीवर प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. विशेषत: तरूणाईला या दिवसाची ओढ मोठी असते. परंतु कोल्हापूर व सांगलीतील छत्रपती प्रतिष्ठान आणि स्टुडंट पॉवर या ग्रुपमधील 100 ते 125 तरूणांनी प्रेम व्यक्त करण्याच्या पारंपारिकतेला छेद दिला. छत्रपती शिवरायांच्या गड-किल्ल्यांवर शतदा प्रेम करावे...अशी हाक देत या तरूणाईच्या शेकडो हातांनी तालुक्‍यातील किल्ले सामानगडची स्वच्छता करून शिवरायांच्या या ऐतिहासिक ठेव्याबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त केले. हा आगळा-वेगळा उपक्रम आदर्शवतच म्हणावा लागेल. 

गडहिंग्लज : "व्हॅलेंटाईन डे' म्हटलं की प्रियकर, प्रेयसी यांच्यासह आपल्या आवडत्या व्यक्तीवर प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. विशेषत: तरूणाईला या दिवसाची ओढ मोठी असते. परंतु कोल्हापूर व सांगलीतील छत्रपती प्रतिष्ठान आणि स्टुडंट पॉवर या ग्रुपमधील 100 ते 125 तरूणांनी प्रेम व्यक्त करण्याच्या पारंपारिकतेला छेद दिला. छत्रपती शिवरायांच्या गड-किल्ल्यांवर शतदा प्रेम करावे...अशी हाक देत या तरूणाईच्या शेकडो हातांनी तालुक्‍यातील किल्ले सामानगडची स्वच्छता करून शिवरायांच्या या ऐतिहासिक ठेव्याबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त केले. हा आगळा-वेगळा उपक्रम आदर्शवतच म्हणावा लागेल. 

"व्हॅलेंटाईन डे'ची प्रतिक्षा करणारा वर्ग मोठा आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी या दिवसाचा मुहूर्त शोधला जातो. परंतु प्रेयसी आणि आवडत्या व्यक्तीसह कुटूंबावर प्रेम व्यक्त करणे म्हणजे व्हॅलेंटाईन अशीच परंपरा आतापर्यंत चालत आली आहे. कोल्हापूर आणि सांगलीच्या तरूणाईने व्हॅलेंटाईन डे आगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निश्‍चय करून त्या दिवशी पहाटेच 100 ते 125 तरूण सामानगडावर दाखल झाले. फावडे, खुरपे, कोयते, बुट्ट्या, झाडू सोबत घेवून गडावरील एकेक ऐतिहासिक ठिकाणे स्वच्छ करण्यास सुरूवात केली. सात कमान विहिर, अंधार कोठडी, हत्ती बुरूज, झेंडा बुरूज आदी ठिकाणावरील झाडाझुडपांसह इतर कचरा हटवण्याची मोहिम राबविली. ठिकठिकाणी असलेले मातीचे ढिगारेही हलविले. गडावर सापडलेल्या नवीन दरवाजाच्या ठिकाणची मातीही या तरूणांनी हटविली. 

खऱ्या अर्थाने प्रेम व्यक्त करायला हवं तर ते छत्रपती शिवाजी महाराजांवर, त्यांनी बांधलेल्या गडकोटावर करायला हवं हा उद्देश बाळगून सांगली व कोल्हापूर येथील छत्रपती प्रतिष्ठान व स्टुडंट पॉवर या ग्रुपने किल्ले सामानगडावरील ऐतिहासिक वस्तूंची स्वच्छता करत अन्य तरूणांसमोर एक आदर्श ठेवला आहे. गडावरील तटबंदीसह विहिरी स्वच्छ करण्यात आल्या. झाडेझुडूपे काढून टाकण्यात आली. व्हॅलेंटाईन डे दिवशी असेही प्रेम व्यक्त केले जावू शकते, हा संदेश या तरूणाईने समाजाला दिला आहे. यावेळी दुर्गवीर प्रतिष्ठानचे सतीश चव्हाण, प्रशांत बाटे, उद्योजक सुनिल चौगुले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

दुर्गवीर प्रतिष्ठानचे सहकार्य 
कोल्हापूर आणि सांगलीतील तरूणाईच्या या उपक्रमाला स्थानिक दुर्गवीर प्रतिष्ठानचे कार्यकर्त्यांनी चांगले सहकार्य केले. गेल्या काही वर्षापासून दुर्गवीर प्रतिष्ठानने किल्ले सामानगडाला गतवैभव मिळवून देण्यासाठी धडपडत आहे. त्यामध्ये विविध घटक सहभागी होत आहेत. व्हॅलेंटाईन डे निमित्त राबवलेल्या उपक्रमावेळी दुर्गवीर प्रतिष्ठानचे सतीश चव्हाण, प्रशांत बाटे, उद्योजक सुनिल चौगुले यांनी कोल्हापूर, सांगलीहून आलेल्या या तरूणांसाठी चहा-नाष्टा, जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youngers Clean Samangad Fort Kolhapur Marathi News