फिल्मी स्टाईलने पाठलाग करून तरुणाचा निर्घृण खून

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

पाठलाग करून डोक्‍यात दगड घातला; पूर्ववैमनस्यातून प्रकार

राजकीय पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याची शक्‍यता

इचलकरंजी (कोल्हापूर)  : कबनूर (ता. हातकणंगले) येथे आज एका युवकाचा थरारक पाठलाग करून डोक्‍यात दगड घालून खून करण्यात आला. संदीप सुरेश माघाडे (वय २७, रा. हराटी भाग, भीमराज भवनजवळ) असे मृताचे नाव आहे. रात्री नऊच्या सुमारास आझादनगर परिसरात हा प्रकार घडला. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. राजकीय पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याची शक्‍यता व्यक्त होत होती. या घटनेनंतर कबनूर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

या घटनेची नोंद करण्याचे काम शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आयजीएम रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळ परिसरातून तलवार, मागाचा मारा, दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

संदीप ऑटोलूम कामगार आहे. रात्री साडेआठच्या सुमारास डेक्कन रोडवर त्याची काही तरुणांबरोबर वादावादी झाली होती. या वादातून हल्लेखोरांनी त्याचा सशस्त्र पाठलाग सुरू केला. सुरूवातीला त्याच्या पायावर मागाचा मारा मारण्यात आला. तो खाली पडल्यानंतर त्याच्या डोक्‍यात दगड घालण्यात आला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.

आझादनगर परिसरातील मुजावर पट्टी भागात प्रकार घडला. त्याला नागरिकांनी तातडीने रिक्षाने आयजीएम रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयात संदीपच्या नातेवाईक व समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून रक्ताने माखलेला दगड, तलवार, मागाचा मारा, दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. तो अविवाहित होता. त्याच्या मागे आई, लहान भाऊ, बहीण असा परिवार आहे. 

हेही वाचा- सरळसेवा पदभरती प्रक्रियेसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची न्यूज

घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, उप अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेत चार ते पाच हल्लेखोर असण्याची शक्‍यता आहेत. त्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकारानंतर कबनूरमध्ये तणावपूर्ण वातावरण असून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth crime case ichalkaranji kabnur kolhapur crime news marathi news