अरूनफिरून क्वारंटाईन...."तो' तब्बल चौथ्यांदा अलगीकरण कक्षात, तिसऱ्यांदा दिला स्वॅब... 

Youth Four Time Quarantine In Gadhinglaj Kolhapur Marathi News
Youth Four Time Quarantine In Gadhinglaj Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : कोरोनाचे महाभयंकर संकट उभा राहिले आहे. त्याच्या संसर्गापासून स्वत:सह इतरांना दूर ठेवण्यासाठी क्वारंटाईन हा चांगला पर्याय. पण, हा सोपा पर्यायसुद्धा स्वीकारावा लागू नये यासाठी अनेकांची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील एक युवक एक-दोन नव्हे तर तब्बल चौथ्यांदा क्वारंटाईन झाला आहे. त्याचे तीन वेळा संस्थात्मक तर एकदा गृह अलगीकरण झाले आहे. 

कौलगे येथील सदरचा युवक नोकरीनिमित्त मुंबई येथे वास्तव्यास आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर 14 मे रोजी त्याने इतरांप्रमाणे आपल्या मूळ गावी परतणे पसंत केले. रेड झोनमधून आल्यामुळे सहाजिकच संस्थात्मक अलगीकरणाशिवाय पर्याय नव्हता. गावातील प्राथमिक शाळेत क्वारंटाईनची व्यवस्था केली होती. शाळेत तो क्वारंटाईन झाला. या ठिकाणी 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर पुन्हा नियमानुसार घरी 14 दिवस गृह अलगीकरणात घालविले. 

दरम्यान, त्याच्या शेजारी असणारे पती-पत्नी मुंबईवरुन आले. गडहिंग्लजमध्ये उतरल्यानंतर त्यांना तपासणीसाठी शेंद्री येथील कोविड केअर सेंटरमध्ये सोडण्यासाठी कोणी नव्हते. शेजारधर्म पाळत सदरचा युवक चारचाकी वाहन घेऊन गडहिंग्लजला आला. त्या वाहनातून दोघांना घेऊन कोविड केअर सेंटरला सोडून आला. दुर्दैवाने प्रथम यातील पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. संपर्कातील असल्याने सदर युवकाला पुन्हा घरी क्वारंटाईन व्हावे लागले. त्यानंतर चार दिवसांनी यातील पतीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे प्रथम संपर्कातील म्हणून संबंधित युवकाला कोविड केअर सेंटरला क्वारंटाईन केले. 

पण, त्याच्यामागे लागलेला क्वारंटाईनचा ससेमिरा इथेही संपलेला नाही. त्याला ज्या खोलीत ठेवण्यात आले होते, त्याच खोलीत कौलगे गावातील एका महिलेलाही क्वारंटाईन केले होते. दुदैवाने तिचा अहवाल पाच दिवसापूर्वी पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे प्रथम संपर्कातील म्हणून संबंधित युवकाचा तेव्हापासून क्वारंटाईन दिवसांचा श्रीगणेशा झाला आहे. मुंबईवरुन आल्यापासून दोन महिन्यातील कसातरी आठवडाभराचा कालावधीत त्याने घराबाहेर काढला आहे. उर्वरित सारे दिवस तो क्वारंटाईनमध्येच आहे. शिवाय तब्बल चार वेळा क्वारंटाईन होणारा तालुक्‍यातील पहिलाच व्यक्ती आहे. 

पुन्हा दिला स्वॅब... 
संबंधित युवकाचा प्रथम मुंबईवरुन आल्यानंतर स्वॅब तपासणीसाठी घेतला होता. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर बाधित पुरुषाच्या संपर्कात आल्यामुळे 5 जुलैला पुन्हा एकदा स्वॅब घेण्यात आला. तीन दिवसानंतर त्याचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. पुन्हा बाधित महिलेच्या संपर्कामुळे आज तिसऱ्यांदा स्वॅब घेतला आहे. या अहवालाची प्रतीक्षा आहे. 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com