मी ठरवले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना कधीही भेटू शकतो, पण... ; खासदार संभाजीराजे 

धनाजी सुर्वे
Friday, 25 September 2020

मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खासदार संभाजीराजे छत्रपती यांना भेटण्यासाठी वेळ देत नसल्याच्या निषेधात आज कोल्हापूर महानगरपालिकेतील सभा तहकूब करण्यात आली.

कोल्हापूर - मराठा आरक्षणाला पाठिंबा आणि संभाजीराजेंना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट नाकारल्याच्या कारणावरून कोल्हापूर महापालिकेची महासभा तहकूब करण्यात आली. मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याच्या कारणावरून सभा तहकूब करणे हे मी मान्य करतो, आणि समाजाच्या वतीने तुम्हा सर्व नेतेमंडळींचे आभारही मानतो. परंतु मला मोदीजींनी भेट नाकारल्याचा उल्लेख करणे म्हणजे केवळ राजकारण आहे. यामुळे मी तुम्हा सर्वांवर नाराज  आहे. मला एकट्याला जाऊन भेटणे आणि श्रेय घेणे शक्य झाले असते. मी ठरवले तर पंतप्रधानांना कधीही भेटू शकतो. पण मला मराठा आरक्षणाच्या लढ्यात श्रेय वाद आणायचा नाही. हा लढा सर्वांचा आहे. तो सर्वांना सोबत घेऊन लढायचा आहे. असे पत्र खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकच्या माध्यमातून प्रसिद्ध केले आहे.

मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खासदार संभाजीराजे छत्रपती यांना भेटण्यासाठी वेळ देत नसल्याच्या निषेधात आज कोल्हापूर महानगरपालिकेतील सभा तहकूब करण्यात आली. पंतप्रधान मोदी मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करत नाहीत. या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कोल्हापूर महानगरपालिकेतील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने केला आहे. याबाबतची भूमिका महापौर निलोफर आजरेकर यांनी मांडली. यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकच्या माध्यमातून एक पत्र पसिद्ध केले आहे. 

संभाजीराजे छत्रपती यांनी काय म्हटले आहे पत्रात?

मी आज वर्तमानपत्रात बातमी वाचली, आणि मला आश्चर्य वाटले. मराठा आरक्षणाला पाठिंबा आणि संभाजीराजेंना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट नाकारल्याच्या कारणावरून कोल्हापूर महापालिकेची महासभा तहकूब करण्यात आली. मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याच्या कारणावरून सभा तहकूब करणे हे मी मान्य करतो, आणि समाजाच्या वतीने तुम्हा सर्व नेतेमंडळींचे आभारही मानतो. परंतु मला मोदीजींनी भेट नाकारल्याचा उल्लेख करणे म्हणजे केवळ राजकारण आहे. यामुळे मी तुम्हा सर्वांवर नाराज  आहे. गेली 14 वर्षे मी मराठा आरक्षणासाठीच्या लढ्यात सक्रिय आहे. आजपर्यंत एकदाही या विषयात मी राजकारण आणले नाही. मराठा आरक्षण हे माझ्यासाठी राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. तुमचे माझ्या विषयीचे प्रेम समजू शकतो, पण....

गेल्या दीड वर्षांपासून कोल्हापुरातील हजारो कोटी रुपयांचा गॅस पाईपलाईनचा प्रकल्प महापालिकेच्या परवानग्या वाचून रखडलेला आहे. त्या परवानग्या तुम्ही दिल्या असत्या, तर कोल्हापूरच्या विकासात फार मोठी भर पडली असती. हा प्रकल्प मंजूर करून आणण्यासाठी मी खूप मेहनत केली आहे. या योजनेमुळे सर्व कोल्हापूरकरांचे भविष्य बदलून जाणार आहे. कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासात ही योजना मैलाचा दगड ठरेल. आजच्या तहकूब झालेल्या सभेत या प्रकल्पाला परवानग्या देणं आवश्यक होतं. 

तसेच, कोल्हापूरच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमच्या टर्फ करीता 5.50 कोटी रुपये केंद्राकडून मी मंजूर करून आणलेत. तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान(टर्फ) बनणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचे मला समजते. त्या संदर्भातील परवानगी या महासभेत दिली असती तर मला आनंद झाला असता. कोल्हापुरातून आंतरराष्ट्रीय स्तराचे हॉकी खेळाडू तयार झाले पाहिजेत हे माझं स्वप्न आहे. 

कोरोनाचा कोल्हापुरात सर्वाधिक प्रकोप वाढला आहे. त्यासाठी अधिक नियोजन करण्याची गरज आहे, त्यासंदर्भातील उपाय योजना या महासभेत केल्या असत्या तर त्या अधिक योग्य झाले असते. पण तुम्ही सर्वांनी ही महासभा माझ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींजींच्या भेटीच्या संदर्भाला चुकीच्या पद्धतीने घेतले. 
राहता राहिला मोदीजींच्या भेटीचा प्रश्न. आज पर्यंत मी जेव्हा केव्हा मोदीजींना वैयक्तिक भेटण्यासाठी गेलो तेंव्हा आमची भेट झालीच आहे. पण यावेळी माझी पंतप्रधानांना अशी मागणी होती की, महाराष्ट्रातील सर्व खासदारांना सोबत घेऊन भेट घ्यावी.  पण कोविडमुळे एवढ्या सर्वांना एकत्र येणं धोक्याचं ठरण्याची शक्यता असावी. त्यामुळे त्यांना तशी वेळ देणं सध्या शक्य होत नसेल कदाचित.  

हे पण वाचा -  आरोग्य अभियानाकडून कोरोना साहित्याचा पुरवठा बंद

 मला एकट्याला जाऊन भेटणं आणि श्रेय घेणं शक्य झालं असतं. मी ठरवलं तर कधीही भेटू शकतो. पण मला मराठा आरक्षणाच्या लढ्यात श्रेयवाद आणायचा नाही. हा लढा सर्वांचा आहे. तो सर्वांना सोबत घेऊन लढायचा आहे. 

हे पण वाचाब्रेकिंग - व्हिजन ऍग्रोचा संचालक सुशील पाटील जेरबंद ; घराच्या पोटमाळ्यावर बसला होता लपून

 तुमच्या माझ्याविषयीच्या भावनेचा मी आदर करतो. आपण सर्व जण मिळून कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत राहू. मराठा आरक्षणाला यश हे मिळणार आहेच. या सदभावने  सह...

 

<

 

>

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yuvraj sambhaji raje written letter on kolhapur corporation general meeting