'गाव करील ते राव काय करील' ; जि.प. शाळेच्या २४ वर्ग खोल्या झाल्या डिजिटल

सदानंद पाटील, प्रकाश नलवडे
Friday, 15 January 2021

गुणवत्तेतही सर्वोत्कृष्ट असणाऱ्या या शाळेलाही ग्रामस्थांनीही भरभरून मदत दिली. यातूनच शाळेचा कायापालट झाला. 

कोल्हापूर (सांगवडेवाडी) : ‘गाव करील ते राव काय करील, अशी म्हण आहे. याची प्रचितीच करवीर तालुक्‍यातील कणेरीवाडी येथील जिल्हा परिषदेची शाळा पाहिली की येते. जिल्ह्यात सर्वाधिक पट असलेली शाळा, अंतर्बाह्य नीटनेटकी शाळा, प्रशस्त व स्वच्छ मैदान असलेली शाळा, सर्व २४ वर्ग खोल्या डिजिटल असलेली शाळा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुणवत्तेतही सर्वोत्कृष्ट असणाऱ्या या शाळेलाही ग्रामस्थांनीही भरभरून मदत दिली. यातूनच शाळेचा कायापालट झाला. 

१९३० च्या दशकात देशाला स्वातंत्र्याचे वेध लागले होते. स्वातंत्र्य चळवळीने वेग घेतला होता. देशात एका बाजूला स्वातंत्र्याचा लढा सुरू असतानाच दुसरीकडे कणेरीवाडी येथे शिक्षणाची ज्ञातज्योत पेटवण्याचे काम स्वातंत्र्यसैनिक तुकाराम रावजी मोरे गुरुजींनी केले. ९० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या शाळेने ही ज्ञानज्योत आजही धगधगत ठेवली आहे.  

हेही वाचा - आजी माजी आमदारांच्या गावात ईव्हीम मशीन पडले बंद -

ग्रामस्थांनी आर्थिक सुबत्ता असतानाही त्यांनी जिल्हा परिषदेची शाळा सोडून इतर शाळांचा विचार केला नाही. या शाळेचा कायापालट करण्याचा निर्धार कोरोनाच्या काळात ग्रामस्थांनी केला. यासाठी घरटी ५०० व त्यापेक्षा अधिक लोकवर्गणी गोळा केली. एक, दोन नव्हे तर जवळपास १५०० कुटुंबांनी मदत केली आहे, तर शिक्षकांनीही दीड लाखाची मदत केली. रोटरीसह अन्य संस्थांनीही मदतीचा हात दिला.

मुख्याध्यापक राहुल ढाकणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कुमार मोरे, उपाध्यक्ष रवींद्र खोत, सरपंच शोभा खोत, उपसरपंच अजित मोरे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने केलेले प्रयत्न व याला पाठिंबा देणारे जि. प.चे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्यामुळे कणेरीच्या शाळेचा कायापालट झाला. खोत यांनी कधी जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन मंडळ असो की सीएसआर निधी, या सर्वातून शाळेचा विकास करण्याचा एक ध्यास घेतला होता. शासकीय निधीसह स्वत: पाच लाखांची वर्गणी देत संकल्प तडीस नेला.

हेही वाचा - ब्रेकिंग ; धारवाडजवळ झालेल्या टेम्पो - टिप्परच्या भीषण अपघातात अकराजण ठार

 

ही आहेत शाळेची वैशिष्ट्ये

 • शाळेचा एकूण पट - ७१३  
 • शिक्षक वर्ग-१९  
 • सर्व २४ खोल्यांत ई-लर्निंग व्यवस्था  
 • वर्ग खोल्यात डिजिटल बोर्ड  
 • अंतर्बाह्य रंगरंगोटी  
 • वारली पेंटिंग  
 • बोलक्‍या भिंती  
 • ऑक्‍सिजन पार्क  
 • प्रयोगशाळा ग्रंथालय  
 • सुसज्ज संगणक लॅब  
 • सुसज्ज स्वच्छता गृहे  
 • कबड्डी, खो-खो, मल्लखांब तसेच विविध खेळांसाठी मैदान  
 • सर्व वर्गात साउंड सिस्टीम  
 • सीसीटीव्ही कॅमेरे  
 • रेन वॉटर हार्वेस्टिंग

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत शाळेचे उद्या उद्‌घाटन

कणेरीवाडी येथील डिजिटल शाळेचे उद्‌घाटन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते शनिवार (ता.१६) दुपारी १२ वाजता होणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होईल. कार्यक्रमास खासदार प्रा. संजय मंडलिक, जि.प.अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे, माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे उपस्थित राहणार आहेत.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: zilha parishad school hightake with the help of village people in kanheri kolhapur