‘ती’ सहन करतेय तोंड दाबून बुक्क्याचा मार

अशोक मुरूमकर
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

ती भीतीमुळे व इतर कारणांमुळे पुढे येत नाहीत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे मजबूत आहेत. मात्र, त्याच्या अंमलबजावणीसाठी होत असलेली दिरंगाई हेच वाढत्या लैंगिक अत्याचारांच्या घटनेचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. अत्याचार व बालकांवरील लैंगिक अत्याचार व ऍसिड हल्ला यात बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसाहाय्य व पुनर्वसन करण्यासाठी सरकार मनोधैर्य योजनेंतर्गत पीडितेला मदत करते.

सोलापूर : "तोंड दाबून बुक्‍क्‍याचा मार सहन करणे' या म्हणीप्रमाणे "ती' अत्याचार सहन करत असल्याचे अलिखित वास्तव चित्र आहे. 2017 ते 2019 या दोन वर्षांत अत्याचाराची सोलापूर जिल्ह्यात 120 प्रकरणे दाखल झाली आहेत. विधिसेवा प्राधिकरणाकडे आलेली ही प्रकरणे असून इतर प्रकरणांची संख्या जास्त आहे. यात अत्याचाराची 21 आणि बाल लैंगिक अत्याचाराची (पॉस्को) 99 प्रकरणे आहेत. यावरून सोलापूर जिल्ह्यात महिला आणि बालके सुरक्षित नसल्याचे सिद्ध होत आहे.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील एकतर्फी प्रेमातून झालेले जळीत हत्याकांड प्रकरण ताजे असतानाच सोलापुरात 10 जणांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे हे प्रकरण समोर आले. मात्र, अशा अनेक घटना आहेत, ती भीतीमुळे व इतर कारणांमुळे पुढे येत नाहीत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे मजबूत आहेत. मात्र, त्याच्या अंमलबजावणीसाठी होत असलेली दिरंगाई हेच वाढत्या लैंगिक अत्याचारांच्या घटनेचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. अत्याचार व बालकांवरील लैंगिक अत्याचार व ऍसिड हल्ला यात बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसाहाय्य व पुनर्वसन करण्यासाठी सरकार मनोधैर्य योजनेंतर्गत पीडितेला मदत करते. प्रकरण दाखल झाल्यानंतर योग्य ती कार्यवाही करून या योजनेचा लाभ दिला जातो. यात 31 डिसेंबर 2017 ते 30 सप्टेंबर 2019 या कालावधीत सरकारकडे आलेल्या पीडितेच्या आकडेवारीनुसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडून 40 प्रकरणे दाखल झाली आहेत. त्यात 28 पॉस्को व 12 अत्याचाराची आहेत. 2017 नंतर 120 प्रकरणे दाखल झाली आहेत. त्यातील 28 पीडितेना लाभ मिळालेला नाही. त्यात 10 प्रकरणे अत्याचार व 18 प्रकरणे पॉस्कोची आहेत. 
पुरुषांकडूनच जास्त अत्याचार
महिलांवर पुरुषांकडूनच जास्त अत्याचार होतात. अत्याचार करणारे सुद्धा कुटुंबातच राहतात. त्यांच्यावर कुटुंबातूनच चांगले संस्कार होणे आवश्‍यक आहे. पीडित बालिका किंवा महिला ही कोणाची तरी आई व बहीण असते याचे भान ठेवायला हवे. याबरोबर मुलींनी सुद्धा स्वत:ची काळजी घेणे आवश्‍यक आहे. अशा घटना घडू नयेत म्हणून जागृती होते. त्याची वास्तवात अंमलजावणी होणे आवश्‍यक आहे. विशेषतः पुरुषांत याबाबत जागृती होणे आवश्‍यक आहे. लहानपणापासूनच नाही हा शब्द स्वीकारायचे शिक्षण कुटुंबातून मिळायले हवं. नकार पचवण्याची ज्याच्यात ताकद नाही, त्यांच्याकडून अशा घटना होत असल्याचे दिसते. हिंगणघाट हा त्याचाच प्रकार आहे. 
- ज्योती अभंगराव, समुपदेशक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 120 rapes in two years in Solapur district