सोलापूर जिल्ह्यातील 36 हजार शेतकऱ्यांना बांधावर मिळाली खते, बियाणे 

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 21 जून 2020

पालकमंत्री दत्तात्रय भरणे खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या बांधावर खते आणि बियाणे उपलब्ध करून द्या, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी नियोजन केले असून त्यानुसार खते आणि बियाणे वितरणास सुरवात केली आहे. 

सोलापूर : जिल्ह्यातील 7 हजार 965 शेतकरी गटांमार्फत 88 हजार 670 क्विंटल खते आणि 2 हजार 784 क्विंटल बियाण्यांचे शेतकऱ्यांच्या बांधावर वितरण करण्यात आले आहे. 36 हजार 324 शेतकऱ्यांना याचा लाभ झाला असून यापुढेही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाणे, खते वितरित केली जातील, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी दिली. 

हेही वाचा : जागतिक योग दिवस : स्वस्थ भारतासाठी योग चळवळ 

पालकमंत्री दत्तात्रय भरणे खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या बांधावर खते आणि बियाणे उपलब्ध करून द्या, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी नियोजन केले असून त्यानुसार खते आणि बियाणे वितरणास सुरवात केली आहे. त्यानुसार आत्मा योजनेअंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या 7965 शेतकरी गटांची मदत घेण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीसाठी बियाणे आणि खतांसाठी प्रवास करावा लागणार नाही, असे बिराजदार यांनी सांगितले. 

हेही वाचा : तीन वर्षे अभ्यास करत ज्योत्स्ना मुळीक एमपीएससीत यशस्वी 

खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली असून जिल्ह्यात बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा आहे. गेल्या तीन वर्षात सरासरी सर्व पिकांसाठी 31 हजार क्विंटल बियाणे वापरले गेले आहे. यावर्षी आजपर्यंत महाबीज मार्फत 4426 क्विंटल आणि खासगी कंपन्यांमार्फत 14062 क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे, असे श्री. बिराजदार यांनी सांगितले. 

मागणीच्या 96 टक्के खताचा पुरवठा 
युरिया 235410, डीएपी 105700 क्विंटल, म्युरेट ऑफ पोटॅश 135800 क्विंटल, एनपीके -129800 क्विंटल तर सिंगल सुपर फॉस्फेट 61500 क्विंटल खते उपलब्ध झाली आहेत, असे श्री. बिराजदार यांनी सांगितले. कृषी निविष्ठांच्या गुणवत्ता तपासणीसाठी 34 गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक काम करीत आहेत. सनियंत्रणासाठी जिल्हा स्तरावर एक आणि तालुका स्तरावर 11 भरारी पथके नियुक्त करण्यात आल्याची माहिती श्री. बिराजदार यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 36 thousand farmers in Solapur district got fertilizers and seeds on the dyke