"या' शहरात एका महिन्यात 57 लाखांची घरफोडी; दागिने, "या' वस्तूंची चोरी 

तात्या लांडगे 
Monday, 3 August 2020

शहरातील बाळे स्टेशन, कोनापुरे चाळ, भाईजी अपार्टमेंट, अंत्रोळीकर नगर, भैरूवस्ती, निर्मिती विहार, इंदिरा प्राथमिक शाळा, नई जिंदगीतील चंद्रकला नगर, जुने आरटीओ ऑफिसजवळ, विष्णू मिल चाळ, न्यू तिऱ्हेगाव, बसवेश्‍वर नगर, विश्राम नगर (होटगी रोड), लिमयेवाडी, अंबिका नगर, कुंभार वेस, बाळीवेस, जुना एम्प्लॉयमेंट चौक, जुना देगाव नाका, वृंदावन सोसायटी, मार्केट कमिटीजवळ, शेळगी, रत्नमंजिरी नगर, गुरुदेव दत्तनगर, साईनाथ नगर, मधला मारुती, स्वामी विवेकानंद नगर (हत्तुरेवस्ती) या परिसरात घरफोडी अन्‌ चोरीच्या घटना घडल्या आहेत. 

सोलापूर : कोरोनामुळे हातातील काम गेल्याने आणि उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर बनल्याने शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जुलै ते 2 ऑगस्ट या काळात शहरात 31 ठिकाणी घरफोडी, चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये तब्बल 56 लाख 92 हजार 427 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील दागिने, रोकड, गॅस सिलिंडर, साड्या, गहू-तांदूळ, टिव्ही अशा वस्तू लंपास केल्याची नोंद शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये झाली आहे. 

हेही वाचा : शहरातील कोरोना संसर्ग येतोय आटोक्‍यात ! आज 42 पॉझिटिव्ह अन्‌ दोघांचा मृत्यू 

शहरातील बाळे स्टेशन, कोनापुरे चाळ, भाईजी अपार्टमेंट, अंत्रोळीकर नगर, भैरूवस्ती, निर्मिती विहार, इंदिरा प्राथमिक शाळा, नई जिंदगीतील चंद्रकला नगर, जुने आरटीओ ऑफिसजवळ, विष्णू मिल चाळ, न्यू तिऱ्हेगाव, बसवेश्‍वर नगर, विश्राम नगर (होटगी रोड), लिमयेवाडी, अंबिका नगर, कुंभार वेस, बाळीवेस, जुना एम्प्लॉयमेंट चौक, जुना देगाव नाका, वृंदावन सोसायटी, मार्केट कमिटीजवळ, शेळगी, रत्नमंजिरी नगर, गुरुदेव दत्तनगर, साईनाथ नगर, मधला मारुती, स्वामी विवेकानंद नगर (हत्तुरेवस्ती) या परिसरात घरफोडी अन्‌ चोरीच्या घटना घडल्या आहेत. 

हेही वाचा : ...अखेर माळशिरस तालुक्‍यातील "या' शिक्षण संस्थेतील पदोन्नतीचा वाद पोचला उच्च न्यायालयात 

कोरोना काळात कोव्हिड केअर सेंटरमध्ये असलेल्या बहुतांश नागरिकांची घरे बंद आहेत. त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवणे सद्य:स्थितीत अशक्‍य आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातील मौल्यवान वस्तू बॅंकांमध्ये ठेवल्यास चोरट्यांच्या हाती काहीच लागणार नाही. दरम्यान, पोलिसांकडून गस्त घालणे, नाईट राउंड वाढविण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्‍त अभय डोंगरे यांनी दिली. काही संशयास्पद हालचाली दिसल्यास नागरिकांनी 0217-2744600 आणि 2744602 या क्रमांकांवर संपर्क करावा, असे आवाहनही त्यांनी केले. 

पोलिस ठाणेनिहाय चोरीच्या घटना 

  • विजापूर नाका : आठ 
  • सदर बझार : सात 
  • सलगर वस्ती : पाच 
  • एमआयडीसी : चार 
  • जेलरोड : दोन 
  • जोडभावी : तीन 
  • फौजदार चावडी : दोन 

याबाबत सोलापूरचे सहायक पोलिस आयुक्त अभय डोंगरे म्हणाले, चोरी होऊ नये आणि चोरी झाल्यानंतर चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके सज्ज आहेत. परंतु, नागरिकांनी घरात विनाकारण सोने, पैसे ठेवू नये. सोने बॅंकांच्या लॉकरमध्ये तर पैसे बॅंकेत ठेवावेत. घराचे कुलूप, कडी-कोयंडा दर्जेदार असावा. सेफ्टी डोअर खूप सुरक्षित ठरते. शहरातील अपार्टमेंट, बंग्लोज्‌ याठिकाणी सीसीटीव्ही बसविल्यास चोरीच्या घटना निश्‍चितपणे कमी होतील. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 57 lakh burglary in a month in Solapur city