तब्बल 650 कोटींचा फटका ! 31 मार्चपर्यंत रेल्वे अन्‌ लालपरी बंद 

तात्या लांडगे
रविवार, 22 मार्च 2020

  • कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारचे ठोस पाऊल 
  • नागपूर विभागातून रेल्वेतून कोळसा वाहतूक बंद 
  • रेल्वे कर्मचाऱ्यांनी घेतली 31 मार्चपर्यंत सुट्टी 
  • लालपरी बंद झाल्याने दररोज 210 कोटींचा बसणार फटका 
  • मुंबईत अत्यावश्‍यक सेवेसाठी महामंडळाच्या 600 बस सुरु राहणार 

सोलापूर : मध्य रेल्वेच्या मुंबई, सोलापूर, पुणे, नागपूर, भुसावळ या विभागातून रेल्वेला दररोज 40 कोटींचे उत्पन्न मिळते. तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला दररोज 20 कोटींचे उत्पन्न मिळते. आता 31 मार्चपर्यंत संपूर्ण रेल्वे व एसटी वाहतूक बंद केल्याने मध्य रेल्वेला 440 कोटींचा तर लालपरीला 210 कोटींचा फटका सोसावा लागणार आहे. 

हेही नक्‍की वाचा : रेल्वे लॉक डाउन ! 31 मार्चपर्यंत एकही रेल्वे धावणार नाही 

सोलापूर विभागाला दररोज अडीच कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे, परंतु कोरोनाच्या भितीने प्रवाशांची संख्या घटल्याने उत्पन्नावर परिणाम झाला आहे. मुंबई विभागातून मध्य रेल्वेला दररोज 22 कोटींचे उत्पन्न मिळते, मात्र मागील 16 दिवसांत या विभागाचे उत्पन्न 10 कोटींनी घटले आहे. तर नागपूर विभागातील माल वाहतूक रेल्वे गाड्या बंद झाल्या असून कामगार 31 मार्चपर्यंत रजेवर गेले आहेत. कोळसा वाहतूक नागपूर विभागातून मोठ्या प्रमाणावर होतो. भुसावळ, पुणे, नागपूर या विभागातून रेल्वेला 21 कोटींचे उत्पन्न अपेक्षित असतानाही त्यात दररोज 12 कोटींची घट झाली आहे. आता रेल्वेच्या लॉक डाउनमुळे रेल्वेच्या उत्पन्नात तब्बल 22 हजार कोटींचा फरक पडेल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तर राज्यातील लालपरीची सेवा मार्चएण्डपर्यंत बंद केली असून मुंबईत फक्‍त कर्मचाऱ्यांसाठी 600 बस सोडण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य महामंडळाचे वाहतूक व्यवस्थापक राहूल तोरो यांनी सांगितले. 

हेही नक्‍की वाचा : जनता कर्फ्यू ! घरगुती विजेच्या वापरात 'एवढी' वाढ 

 

कोरोनाचा रेल्वेच्या उत्पन्नावर परिणाम : नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची 
सोलापूर विभागाला दररोज सरासरी अडीच कोटींचे उत्पन्न प्रवाशांमधून मिळते. मात्र, मागील 17 दिवसांपासून सोलापूर विभागाचे उत्पन्न 16 कोटींपर्यंत कमी झाले आहे. आता 31 मार्चपर्यंत सर्वच रेल्वे गाड्या रद्द केल्याने 25 कोटींपर्यंत उत्पन्न कमी होईल. परंतु, कोरोना या विषाणूशी मुकाबला करण्यासाठी नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. 
- प्रदिप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर रेल्वे 

 

हेही नक्‍की वाचा : तिजोरीला कोरोनाची झळ ! महसुलात 13 हजार कोटींची घट 

 

घरबसल्या मिळणार तिकीटाचा परतावा 
गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने पीआरएस काउंटर तिकिटांच्या परताव्याचे नियम शिथिल केले आहेत. ई-तिकिटचे नियम समान असून तिकीट परताव्यासाठी प्रवाशांना स्टेशनवर येण्याची आवश्‍यकता नाही. 21 मार्च ते 15 एप्रिलपर्यंत हे नियम लागू राहतील, असेही रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. प्रवासाच्या तारखेपासून 45 दिवसांपर्यंत तिकिट जमा केल्यावर काउंटरमधून परतावा मिळेल. तर ट्रेन रद्द नाही, परंतु प्रवासी प्रवास करण्यास इच्छूक नाहीत, अशांना 30 दिवसांत तिकिट ठेव पावती दाखल करता येईल. ट्रेनच्या चार्टमधून पडताळणी करून परतावा दिला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 650 crore hit Until March 31, the train and bus are closed