
ठळक बाबी...
सोलापूर : देशातील कोरोनाला हद्दपार करण्याकरिता या विषाणूची संक्रमण साखळी खंडीत होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर राज्यातील एक कोटी 72 लाख घरगुती वीज ग्राहकांकडून रविवारी (ता. 22) आठ हजार 600 मेगावॅटपर्यंत वीजेचा वापर होईल, असे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तत्पूर्वी, राज्यातील घरगुती ग्राहकांसाठी दररोज सरासरी सहा 270 हजार मेगावॅट वीज लागते, असेही ते म्हणाले.
हेही नक्की वाचा : जनता कर्फ्यू म्हणजे केअर फॉर यु...नक्की सहभागी व्हा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह बहूतांश राज्यातील उद्योग कमी- अधिक प्रमाणात सुरु आहेत. तर विदर्भ- मराठवाड्यात काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस पडल्याने शेतीसाठी वीजेचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे महावितरणकडे पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध आहे. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी महावितरणकडून नियमित 18 हजार मेगावॅट वीजेचा पुरवठा केला जातो. मात्र, मागील काही दिवसांत कमर्शियल वीजेची मागणी सहा ते सात हजार मेगावॅटने घटल्याचेही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सोलापूर शहर- जिल्ह्यात महावितरणचे एकूण दहा लाख 80 हजार ग्राहक असून त्यामध्ये साडेतीन लाख शेती तर साडेपाच लाख घरगुती वीजेचे ग्राहक आहेत. त्यांच्यासाठी नियमित दोनशे मेगावॅट वीज लागते. मात्र, कोरोनामुळे मागील काही दिवसांपासून उद्योग, व्यवसायांच्या तुलनेत घरगुती व शेतीसाठी वीजेचा वापर वाढल्याची माहिती अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी दिली.
हेही नक्की वाचा : तिजोरीला कोरोनाची झळ ! राज्याच्या महसुलात 13 हजार कोटींची घट
वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध
राज्यातील पावणेदोन कोटी घरगुती ग्राहकांना नियमित सहा हजार मेगावॅटपर्यंत वीज लागते. रविवारी (ता. 22) जनता कर्फ्यूमुळे राज्यातील घरगुती विजेची मागणी वाढली आहे. महाराष्ट्रासह बहूतांश राज्यातील उद्योग कमी- अधिक प्रमाणात सुरु आहेत. तर विदर्भ- मराठवाड्यात काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस पडल्याने शेतीसाठी वीजेचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे महावितरणकडे पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध आहे.
- पी. एस. पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, महाराष्ट्र
हेही नक्की वाचा : रेल्वे लॉक डाऊन ! देशातील रेल्वे वाहतूक 31 मार्चपर्यंत बंद
तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
महावितरण कंपनीने स्वत:च्या व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या मार्चएण्डपर्यंत रद्द केल्या आहेत. देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या हेतूने केंद्र व विविध राज्य सरकारकडून नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे घरबसल्या मनोरंजन म्हणून नागरिक दूरचित्रवाणीवर विविध कार्यक्रम पाहत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विजेचा लपंडाव होऊ नये, त्याचा नागरिकांना त्रास सोसावा लागू नये या हेतूने महावितरणने तांत्रिक कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या असून ते सध्या मुख्यालयातच बसून आहेत. शहर- जिल्ह्यातून फोन येतातच, त्याठिकाणी जाऊन तत्काळ दुरुस्ती केली जात असल्याचेही महावितरणचे सोलापूरचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी 'सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.