रेल्वे लॉक डाऊन ! मार्चएण्डपर्यंत एकही रेल्वे धावणार नाही 

तात्या लांडगे
Sunday, 22 March 2020

ठळक बाबी... 

  • 31 मार्चपर्यंत एकही रेल्वे धावणार नाही : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचा तातडीचा निर्णय 
  • मेल, पॅसेंजर, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या बंद 
  • मेट्रो रेल्वेचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा : केंद्रीय रेल्वे मंत्रालय 
  • प्रवाशांना घराबाहेर तथा गाव-शहरातच थांबण्याचे आवाहन 
  • गर्दीतून कोरोना या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी घेतला निर्णय 

सोलापूर : कोरोना या विषाणूच्या संक्रमणाची साखळी खंडीत करण्यासाठी 31 मार्चपर्यंत देशातील सर्व रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. शहरांमधील मेट्रो सुरु ठेवायची की बंद, तेथील स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा, असेही केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. आगामी दोन हजार 400 तास रेल्वे वाहतूक बंद करीत प्रवाशांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. 

हेही नक्‍की वाचा : जनता कर्फ्यू म्हणजे केअर फॉर यु...नक्‍की सहभागी व्हा 

महाराष्ट्रासह देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रविवारी (ता. 22) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू लागू केला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले. मात्र, कोरोनाची भिती ऑगस्टपर्यंत असेल, असे तज्ज्ञांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले. या पार्श्‍वभूमीवर पावसाळ्यापूर्वी उन्हाळ्यातच कोरोनाला देशातून हद्दपार करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांना घरात मनोजंन व्हावे या हेतूने महावितरणच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करुन आगामी चोवीशे तास रेल्वे वाहतूक बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. 

हेही नक्‍की वाचा : राज्याच्या तिजोरीला कोरोनाचा फटका 

राज्य सरकारला केंद्र सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी विविध शहरांमध्ये कलम 144 अंतर्गत जमाव बंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबई, पुणे, सोलापूरसह अन्य जिल्ह्यांमध्ये जमाव बंदीचे आदेश लागू केले आहेत. तसेच अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य दुकाने उघडण्यावरही बंदी घातली असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांमार्फत कारवाई केली जात आहे. रस्त्यांवर, बस स्थानके, रेल्वे स्थानकांसह सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना दुप्पट दंड आकारला जात आहे. कोरोना संशयीतांना 14 दिवस घरी राहण्याच्या सूचना देऊनही ते रेल्वेने प्रवास करु लागले आहेत. रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या मोठी असते आणि रेल्वे प्रशासनाला पुरेशा प्रमाणात थर्मल स्क्रिनिंग मशिन उपलब्ध झालेल्या नाहीत. या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. 

हेही नक्‍की वाचा : विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर दर्शनासाठी बंद 

रेल्वे 31 मार्चपर्यंत धावणार नाही 
केंद्रीय मंत्रालयाने नुकताच निर्णय घेतला असून त्यानुसार 31 मार्चपर्यंत आगामी दोन हजार 400 तास देशातील कोणत्याही मार्गावर एकही रेल्वे गाडी धावणार नाही. त्यामध्ये मेल, पॅसेंजर, लोकल गाड्या धावणार नाहीत. 
- प्रदिप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर रेल्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: railway 31 march lock down