शिक्षक पात्रता परीक्षेत सोलापुरातील 96 टक्के भावी गुरुजी झाले "फेल' 

शिक्षक पात्रता परीक्षेत सोलापुरातील 96 टक्के भावी गुरुजी झाले "फेल' 

सोलापूर ः विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी निवड करण्यात येणाऱ्या शिक्षकांची पात्रता परीक्षा घेतली जाते. जानेवारीमध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) जिल्ह्यातील 96 टक्के भावी गुरुजी "फेल' (अनुत्तीर्ण) झाले आहेत. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे शिक्षक होण्याचे स्वप्न भंग पावले आहे. जिल्ह्यातून ही परीक्षा 11 हजार 632 विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी केवळ 490 जणच शिक्षक होण्यास पात्र ठरले आहेत. 
शिक्षक होण्यासाठी बारावीनंतर डीएडला प्रवेश घ्यावा लागतो. दोन वर्षाचा डीएडचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर संबंधित विद्यार्थी शिक्षक म्हणून नोकरी करु शकत होता. मात्र, बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार या कायद्याने शिक्षक होण्यासाठी डीएड पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्याचा निर्णय झाला. त्यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच शिक्षक म्हणून नोकरी देण्याचे आदेश सरकारने काढले. तेव्हापासून आतापर्यंत जवळपास चार-पाच "टीईटी' परीक्षा घेण्यात आल्या. मात्र, जवळपास सर्वच परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी पाचपेक्षा कधीही जास्त आढळून आली नाही. पात्रता परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शिक्षक म्हणून नोकरीवर घेतले जाते. त्यामुळे आता फक्त डीएड करुन चालत नाही. पूर्वी डीएड उत्तीर्ण झाले की शिक्षक झाले अशीच स्थिती होती. मात्र, विद्यार्थ्यांना अध्यापन करणारे शिक्षक गुणवत्तापूर्ण असावेत याच कारणासाठी "टीईटी' परीक्षा घेण्याचा निर्णय झाला होता. एकीकडे हा दृष्टीकोन योग्य असला तरी या निर्णयामुळे बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 
राज्यात 2013 ते 2016 या कालावधीत नोकरीत लागलेल्या शिक्षकांना "टीईटी' उत्तीर्ण होण्यासाठी तीन संधी देण्यात आल्या होत्या. त्या तीन संधीमध्ये ते शिक्षक जर ही परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत तर त्यांच्या सेवा समाप्त करण्याचे आदेशही सरकारने दिले होते. पण, त्याबाबत अद्यापही काही ठोस कार्यवाही झालेली नाही. 2016 नंतर ज्यांना शिक्षक म्हणून नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी "टीईटी' परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असल्याची अट घातली आहे. ती परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय शिक्षक म्हणून नोकरी करता येणार नसल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे. या परीक्षेसाठी पहिली ते पाचवीसाठी पेपर एक व सहावी ते आठवीसाठी पेपर दोन ठेवण्यात आला होता. पेपर दोनमध्ये दोन भाग करण्यात आले होते. त्यामध्ये गणित विषय असणारे शिक्षक व सामाजिक शास्त्र विषय असणाऱ्या शिक्षकांचा समावेश होता. 

"टीईटी' परीक्षेची जिल्ह्यातील स्थिती 
परीक्षेसाठी अर्ज भरले 
12760 
प्रत्यक्षात परीक्षा दिली 
11632 
परीक्षेस गैरहजर राहिले 
1128 
उत्तीर्ण झाले 
490 
अनुत्तीर्ण झाले 
11142 
उत्तीर्णची टक्केवारी 
3.84 टक्के 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com