esakal | अजितदादांना सल्ला देण्यापूर्वी चंद्रकांतदादांनी त्यांच्या ताटाखालील खरकटे काढावे 
sakal

बोलून बातमी शोधा

umesh patil

अजित पवारांकडे काम घेऊन गेलेल्या माणसाला पुन्हा त्याच कामासाठी परत यावे लागत नाही. तुमच्या पक्षातील 90 टक्के आमदार अजित पवारांच्या कार्यशैलीबद्धल तुमच्यापेक्षा जास्त समाधानी आहेत. विरोधी पक्षाचा आमदार असला तरीही त्याच्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून पाहण्याचा उमदेपणा अजित पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबीयांकडे आहे. अजित दादा महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या इतिहासात रेकॉर्ड ब्रेक मताधिक्‍याने निवडून आले आहेत. लोकशाहीत एखाद्याचे नेतृत्व सर्वसामान्य जनता प्रमाणित करते. त्यामुळे दादांना तुमच्या प्रमाणपत्राची व सल्ल्याची गरज नसल्याचेही उमेश पाटील यांनी सांगितले. 

अजितदादांना सल्ला देण्यापूर्वी चंद्रकांतदादांनी त्यांच्या ताटाखालील खरकटे काढावे 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकारी आणि प्रशासन कसे चालवावे? याबाबत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सल्ला दिला आहे. याच सल्ल्याचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी खरपूस समाचार घेतला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपमधील बहुजन नेत्यांची कुचंबना चव्हाट्यावर मांडली आहे. भाजपमध्ये बहुजन नेत्यांचा कसा छळ केला जातो हे जाहिरपणे सांगून तुमचे व तुमच्या नेत्यांचे वस्त्रहरण केल्याचे टिकास्त्र उमेश पाटील यांनी सोडले आहे.

चंद्रकांतदादांनी त्यांच्या ताटातील खरकटे काढायचे बघावे, उगीच दुसऱ्याचे वाकून बघण्याच्या नादात स्वत:चे उघडे पडायचे अन्‌ हसं व्हायचे, असं व्हायला नको अशी खोचक टिकाही उमेश पाटील यांनी केली आहे. माजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अजित पवार यांना सल्ला द्यावा एवढी त्यांची पात्रता नाही. तुम्ही उपरे असून सुद्धा कोथरूडच्या मतदारांनी तुम्हाला निवडून दिले. सध्या तुम्हाला काहीच काम नाही. तरी तुम्ही आठवड्यातून किती दिवस कोथरूड साठी वेळ देता? तुम्ही कोल्हापूर, जळगाव व पुण्याचे पालकमंत्री असताना काय दिवे लावले? हे महाराष्ट्राने पाहिले आहे. दुसऱ्या पक्षातील प्रस्थापित नेते गळाला लावण्यासाठी तुम्ही तुमचे मंत्री पद पणाला लावल्याचा आरोपही उमेश पाटील यांनी केला आहे.

फोडा फोडी करण्याशिवाय तुम्ही कोणते देशहिताचे कार्य केले ? तुमच्याकडे असलेल्या खात्यांचा एखादा तरी ठोस निर्णय तुम्ही सांगू शकाल काय ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी साडेसहापासून कामाला सुरूवात करतात. मंत्रालयात शिपाई पोहोचायच्या आगोदर अजित पवार मंत्रालयात पोहचलेले असतात. रात्री उशीरापर्यंत त्यांचे एकट्याचेचच दालन चालू असते. अजित पवारांची कार्यशैली सर्वसामान्य जनता मागील 35 वर्षापासून ओळखून आहे. त्यांची निर्णय क्षमता व कामाचा झपाटा पाहणाऱ्याला दम लागावा, येवढा त्यांचा कामाचा उरक आहे. 
शिवाय ते एक मिनिट सुद्धा वायफट वेळ घालवत नाहीत.