समाधानकारक : कित्येक वर्षांनंतर पंढरपूर तालुक्‍यात यंदा "इतक्‍या' हजार एकर क्षेत्रावर खरिपाचा पेरा ! 

Kharip
Kharip

पंढरपूर (सोलापूर) : मागील अनेक वर्षांनंतर यंदाच्या वर्षी जून-जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडला आहे. त्यामुळे खरिपाचा पेरा वाढला आहे. तालुक्‍यात यावर्षी प्रथमच तब्बल पाच हजार 427 एकर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली आहे. मागील वर्षातील पावसाची सरासरी सुरवातीच्या दोन महिन्यांतच ओलांडली आहे. मका, बाजरी, तूर आदी प्रमुख पिके जोमात वाढू लागली आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार युरियासह इतर निविष्ठांचा पुरवठा केला आहे. खरीप पिकांबरोबरच फळबागांची देखील लागवड वाढली आहे, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे यांनी दिली. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात मार्चपासून लॉकडाउन आहे. अजूनही अनेक ठिकाणी लॉकडाउन सुरू आहे. अशातच यावर्षी जून-जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. दोन दिवसांपासून तालुक्‍याच्या सर्वच भागांत पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. समाधानकारक पावसामुळे ओढे, नाले भरून वाहू लागले आहेत. विहिरी व विंधन विहिरींची पाणीपातळी वाढली आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे यावर्षी तालुक्‍यात पाच हजार 427 एकर क्षेत्रावर विविध पिकांची पेरणी करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक चार हजार 482 एकरावर मक्‍याची पेरणी करण्यात आली. त्याखालोखाल 125 एकरावर बाजरी पिकाची पेरणी झाली आहे. 

भुसार पिकांबरोबरच यावर्षी उडीद, मूग, तूर या कडधान्यांची 177 एकरावर लागवड करण्यात आली आहे. तर भुईमूग आणि सोयाबीन या तेलबियांची देखील 122 एकरावर लागवड करण्यात आली आहे. खरीप पिकांबरोबच मागील दोन महिन्यांत तालुक्‍यात दोन हजार 171 हेक्‍टर क्षेत्रावर डाळिंब, आंबा, सीताफळ, द्राक्ष, चिंच, पपई, लिंबू, केळी, मोसंबी आदी फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. याशिवाय तालुक्‍यात 778 हेक्‍टर क्षेत्रावर आडसाली उसाची लागवड करण्यात आली आहे. तालुक्‍यात एकूण चार हजार 910 हेक्‍टर क्षेत्रावर विविध पिकांबरोबर फळबागांची लागवड करण्यात आली आहे. यंदाच्या खरिपाबरोबर पावसाळा शेतकऱ्यांना सुखावह ठरला आहे. 

भाळवणी (ता. पंढरपूर) येथील प्रगतशील शेतकरी शकील काझी म्हणाले, यावर्षी मागील अनेक वर्षांनंतर जून-जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला आहे. रब्बीचा जिल्हा अशी सोलापूर जिल्ह्याची ओळख असली तरी यंदा प्रथमच खरिपात पेरणी झाली आहे. पंढरपूर तालुक्‍यातील अनेक भागांत मका, बाजरी, तूर यासह इतर पिकांची पेरणी करण्यात आली आहे. कृषी विभागाने यावर्षी बियाणे आणि खते शेतकऱ्यांच्या बांधावर पोच केली आहेत. त्याचाही चांगला परिणाम दिसून आला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com